‘रामायण’ ही मालिका यापुढेही दहा-पंधरा वर्षांनी जरी पुन्हा प्रक्षेपित केली तरी त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी व्यक्त केला. रामायण या मालिकेमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. मात्र सुरुवातीच्या काळात ही भूमिका साकारण्यास ते फारसे उत्सुक नव्हते. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

ते म्हणाले, “रामायण मालिकेत काम करत असताना मला बऱ्याच चित्रपटांना नकार द्यावा लागला होता. त्यामुळे मी सुरुवातीला फारसा खूश नव्हतो. मात्र नंतर मला त्या भूमिकेचं महत्त्व समजू लागलं. आता अनेक वर्षांनंतरही लोक मला त्याच भूमिकेसाठी ओळखले जातात.”

आणखी वाचा : रामायणावरील खटल्यांमुळे रामानंद सागर करू शकले नव्हते उत्तर रामायणाचं दिग्दर्शन

रामायण मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक खऱ्या आयुष्यातही देव समजू लागले होते. अनेकजण त्यांना भेटल्यावर त्यांच्या पाया पडायचे. या आठवणी सांगताना ते पुढे म्हणाले, “रामायण म्हटल्यावर सर्वांत आधी माझ्या डोक्यात काय विचार येत असेल तर ते म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम. आम्ही दुकानात खरेदीसाठी गेलो तरी लोक तिथे आमच्या पाया पडायला यायचे.”

या मालिकेने १६ एप्रिल रोजी टीआरपीचा विश्वविक्रम केला. ७.७ कोटी व्ह्यूअर्स या मालिकेला मिळाले. तर १९८७ ते १९८८ या कालावधीत ही मालिका सर्वाधिक पाहिली गेली होती. जून २००३ पर्यंत या मालिकेची ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये सर्वाधिक पाहिली गेलेली पौराणिक मालिका म्हणून दखल घेण्यात आली होती.