रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने अनेकांची मनं सहज जिंकून घेतली आहेत. ८०-९० चा काळ गाजविणारी ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली असून सध्या ही मालिका लोकप्रियतेत प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे या मालिकेसोबतच तब्बल ३३ वर्षांनंतर मालिकेतील सगळेच कलाकार प्रकाशझोतात आले आहे. इतकंच नाही तर हे कलाकार सोशल मीडियावरही सक्रीय झाले असून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यामध्येच मालिकेत राम ही भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी मालिकेतील सगळ्या अवघड सीनविषयी सांगितलं.

सध्या अभिनेता अरुण गोविल सोशल मीडियावर सक्रीय असून ते ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यामध्येच चाहतेदेखील #AskArun या हॅशटॅगअंतर्गंत त्यांच्या मनातील प्रश्न बिनधास्तपणे अरुण यांना विचारत आहेत. यामध्येच एका चाहत्याने त्यांना मालिकेतील कोणत्या प्रसंगाचं चित्रीकरण कठीण वाटलं, असा प्रश्न विचारला. त्यावर अरुण यांनी उत्तर देत महाराज दशरथ यांचा मृत्यू असं उत्तर दिलं.

मालिकेमध्ये राजा दशरथ यांचा मृत्यू दाखविण्यात आला आहे. हा सीन करणं माझ्यासाठी खरंच कठीण होतं. त्यावेळी राजा दशरथ यांचा मृत्यू झाल्यामुळे मला त्यावेळी रामाच्या भावना व्यक्त करायच्या होत्या. हे खरंच माझ्यासाठी फार कठीण होतं, असं अरुण गोविल यांनी सांगितलं.

दरम्यान,ज्यावेळी राजा दशरथ यांचा मृत्यू होतो, त्यावेळी राम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासात असतात. त्यावेळी त्यांना दशरथ राजाच्या मृत्यूची बातमी समजते. हा सीन जरी कठीण असला तरीदेखील तो त्यांच्या आवडीचा सीन असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.