पिंपरी: सैराट चित्रपट चांगला होता, मात्र त्याचा शेवट मला पटला नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. तथापि, मंजुळे यांनी मात्र समाजात जे घडते, तेच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे या वेळी सांगितले.

सैराट चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगावरून यापूर्वी अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मंजुळे यांच्यासमोर पुन्हा एकदा त्यावर चर्चा झाली. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, परिषदेची भोसरी शाखा आणि लायन्स क्लब भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय गदिमा महोत्सवात रमेश देव यांना साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गदिमा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रमहर्षी, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना शब्दयात्री, तर रेखा मुसळे यांना लोककला पुरस्काराने गौरवण्यात आले.

कार्यक्रमात मंजुळे यांची मुलाखत सुरू असताना त्यांना मध्येच थांबवत रमेश देव यांनी सैराट चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगाचा मुद्दा मांडला. शेवट असा नको होता, असे ते म्हणाले. त्यावर मंजुळे म्हणाले, समाजात सध्या जे घडते, ते दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयावर यापूर्वी अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे.