‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या सिनेमांबद्दल आता खरे तर काही बोलण्यासारखे उरलेच नाही. एखादा सिनेमा कोणकोणते रेकॉर्ड मोडू शकतो, यासाठी जेव्हा काही उदाहरणं दिली जातील त्यात बाहुबली सिनेमाचे नाव अर्थात पहिले असेल. या सिनेमात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या मानधनात घसघशीत वाढही केली. आपल्या सिनेमात या कलाकारांनी काम करावे असे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रत्येक निर्मात्याला सध्या वाटत असणार यात काही शंका नाही. पण या शर्यतीत बॉलिवूड निर्मातेही काही मागे नाहीत.

अनेक बड्या बॉलिवूड निर्मात्यांनी आपल्या सिनेमात प्रभास, अनुष्का, राणा यांनी काम करावे यासाठी प्रयत्न केले होते. आता तुम्ही म्हणाल बॉलिवूड आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये बाहुबली सिनेमाने सर्वाधिक कमाई केली म्हणून त्यांना या भाषांमध्ये अधिक मागणी असणार, यात काय विशेष. पण असं नाहीये या कलाकारांना हॉलिवूडमधूनही विचारणा होत आहे. ‘बाहुबली’तल्या ‘भल्लालदेव’च्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अभिनेता राणा डग्गुबातीला आता हॉलिवूड सिनेमाची लॉटरी लागली आहे.

राणाने ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’मध्ये नकारात्मक भूमिका साकारूनही प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. बाहुबली अर्थात प्रभासच्या तोडीसतोड काम त्याने या दोन्ही सिनेमात केलं. त्यामुळे प्रभास इतकंच कौतुक त्याचंही झालं. त्यामुळेच की काय आता त्याची हॉलिवूडमधील मागणी वाढली आहे. नुकतंच राणाने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची घोषणा केली.

यूकेच्या स्टुडिओ ‘द लंडन डिजिटल मुव्ही अॅण्ड टिव्ही स्टुडिओज’ने एशियन अॅम्बेसेडर म्हणून राणाची निवड केलीये. इतकंच नाहीतर राणा डग्गुबतीनं त्यांच्यासोबत एक सिनेमाही करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राणाला आता हॉलिवूडमध्येही बघायला मिळणार या विचाराने त्याचे चाहते सुखावले आहेत. तसंच या हॉलिवूडपटात राणाची नेमकी काय भूमिका असणार याचीही उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.

https://www.instagram.com/p/BXKAwL2FkKl/

दरम्यान, सध्या राणा आपला आगामी सिनेमा ‘नेने राजू नेने मंत्री’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा सिनेमा सध्याच्या राजकारणावर भाष्य करतो. राजकारणात काहीतरी करू पाहणाऱ्या एका व्यक्तीच्या भूमिकेत राणा दिसणार आहे. या सिनेमात राणासोबत काजल अग्रवालचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तेलगु, तामिळ आणि मल्याळम या तीन भाषांमध्ये येत्या ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होईल.