लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांना घरघर लागलेली असताना पारले-जी या बिस्किट उत्पादक कंपनीनं सर्वाधिक उत्पादनाची विक्री केली आहे. लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी पारले-जी बिस्किट आधार ठरले. सर्वाधिक विक्रीमुळे चर्चेत आलेल्या पारले-जी कंपनीकडे अभिनेता रणदीप हुड्डानं एक विनंती केली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून रणदीनं कंपनीला एक बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

देशात लोकप्रिय असलेली पारले-जी कंपनीनं लॉकडाउनच्या काळातही अधिक फायद्यात राहिल्याचं समोर आलं. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग आणि सेवा क्षेत्रातील कंपन्या तोट्यात असताना पारले-जी कंपनीनं सर्वाधिक बिस्किट विक्रीची नोंद केली आहे. लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांनी घरांकडे जाण्यासाठी रस्ता धरल्यानंतर कामगारांना पारले-जी बिस्किट आधार ठरले. ‘पारले-जी’च्या विक्रीची चर्चा सुरू असताना अभिनेता रणदीप हुड्डानं कंपनीकडे एक विनंती केली आहे.

रणदीपनं एक ट्विट केलं आहे. “रंगभूमीवर कामाला सुरूवात केल्यापासून माझ्या संपूर्ण करिअरमध्ये चहा आणि ‘पारले-जी’ने आधार देण्याचं काम केलं. पण तुम्ही विचार केला आहे का?, जर पारले जीने पॅकिंगसाठी बायोडिग्रेडेबल (विघटनशील) साहित्य वापरले, तर सिंगल यूज प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण किती कमी होऊ शकते? आता पारले जीची विक्री वाढली आहे. त्यामुळे चांगल्या भविष्यासाठीही योगदान देऊ शकता,” असं रणदीपनं म्हटलं आहे.

लॉकडाउनच्या काळात बिस्किटांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. विशेषतः पारले-जीच्या विक्रीत मोठी वाढ झाली. याला पारले-जीच्या व्यवस्थापनानेही दुजोरा दिला आहे. ““एकूण मार्केट शेअरमध्ये आमची एकूण ५ ट्क्के वृद्धी झाली आहे. पण त्यातही ८० ते ९० टक्के वृद्धी ही केवळ पारले-जीच्या विक्रीमुळे झाली आहे. हे अनपेक्षित आहे,” अशी माहिती पारले प्रोडक्ट्सचे मयांक शाह यांनी दिली होती. २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी बिस्किटांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना काम सुरु कऱण्याची परवानगी देण्यात आली होती. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही केली होती.