अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिचा ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी बंद (सस्पेंड) करण्यात आला आहे. ट्विटरचे नियम मोडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कंगना जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरी तिची बहीण रंगोली ट्विटरवर नेहमीच चर्चेत असते. कंगनाविषयी किंवा इतर चालू घडामोडींवर ती सतत ट्विट करताना दिसते. मात्र या ट्विट्सद्वारे द्वेष पसरवला जात असल्याने ट्विटरने तिचा अकाऊंट सस्पेंड केला आहे.

नेहमीच वादग्रस्त ट्विट करण्यासाठी रंगोली प्रसिद्ध आहे. ट्विटरद्वारे ती अनेकदा इतरांवर आरोप-प्रत्यारोप, टिकाटिप्पणी करताना दिसते. मात्र ते करताना ट्विटरच्या नियमांकडे तिने दुर्लक्ष केलं.

आणखी वाचा : ‘काही जोकर्समुळे पसरतोय करोना’; लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर भडकला सलमान

गेल्या काही दिवसांपासून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केल्याने चर्चेत होती. ‘महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वाची गरज आहे’,असं म्हणत तिने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आता ट्विटरवर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर रंगोली व कंगना रणौत या दोघींची नावं ट्रेण्ड होत आहेत. काहींनी रंगोलीला पाठिंबा देत तिची काय चूक आहे, असा प्रश्न विचारला तर काहींनी तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.