बॉक्स ऑफीसवर चित्रपट यशस्वी ठरण्यासाठी हिरोइनसोबत हिरो हवाच, हे समीकरण अभिनेत्री राणी मुखर्जीनं कित्येक वर्षांपूर्वीच खोडून काढलं. ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’ अशा दमदार कथानकाच्या जोरावर तिने अभिनेत्याविनाच चित्रपट सुपरहिट करून दाखवले. तिच्या ‘हिचकी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ७५ कोटींचा गल्ला जमवला होता. आता तिच्या गाजलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
पोलिसाच्या गणवेशात राणी मुखर्जी बिनधास्तपणे उभी असल्याचं या फोटोत पाहायला मिळत आहे. आत्मविश्वासपूर्ण आणि भेदक अशी तिची नजर लक्ष वेधून घेत आहे. २०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप आवडली. लहान मुलांचं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या गँगचा पर्दाफाश करणाऱ्या डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेतील राणीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
Here's the first look… Rani Mukerji in #Mardaani2… Directed by Gopi Puthran… Produced by Aditya Chopra… 2019 release. pic.twitter.com/xtaCofVbU3
— taran adarsh (@taran_adarsh) April 30, 2019
मर्दानीच्या सीक्वलमध्ये राणी एका २१ वर्षांच्या खलनायकासोबत लढताना दिसणार आहे. यावेळीचं कथानंतर पूर्णपणे वेगळं आहे. ‘मर्दानी २’चे दिग्दर्शन गोपी पुथरन करणार असून आदित्य चोप्रा चित्रपटाची निर्मिती करत आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं कळतंय.