रंजीत हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु प्रामुख्याने त्यांचं खलनायक व्यक्तिरेखांसाठी विशेष कौतुक केलं जातं. परंतु रुपेरी पडद्यावर या खलनायिकी भूमिका साकारणं वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना अनेकदा भारी पडलं आहे. एकदा तर त्यांच्या आईनं चित्रपटातील एक रेप सीन पाहून त्यांना घरातून बाहेर देखील काढलं होतं.

रंजीत यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी घरातून बाहेर काढल्याचा हा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “त्यावेळी माझ्या घरात अत्यंत पारंपारिक वातावरण होतं. घरातील कोणीच फारसे चित्रपट वगैरे पाहायचे नाहीत. किंबहूना स्क्रिनवर जे दाखवलं जातंय ते खरंच घडतंय की काय? असं आमच्या कुटुंबियांना वाटायचं. अर्थात त्यावेळी चित्रपट, टीव्ही वगैरे फारच कमी लोकांकडे असायचे त्यामुळे सर्वत्र असंच वातावरण होतं. त्यातच माझ्या कुटुंबियांनी शर्मिली हा चित्रपट पाहिला. त्यामध्ये माझ्या एक रेप सीन होता. तो सीन पाहून आई-वडिल माझ्यावर संतापले. मी खरंच एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केले आहेत असा विचार करुन त्यांनी मला घरातून बाहेर काढलं. त्यानंतर काही काळ मी चित्रपटात काम केलं नाही. मी चित्रपटामध्ये केवळ अभिनय करतो ते वास्तवात घडत नाही हे मोठ्या कष्टाने मी माझ्या कुटुंबियांना समजावलं. त्यानंतर पुन्हा एकदा माझ्या फिल्मी करिअला सुरुवात झाली.”