रानू मंडल हे नाव आता काही नवीन नाही. सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमुळे त्या रातोरात प्रसिद्ध झाल्या आणि अगदी गानकोकीळा लतादीदींपर्यंत त्यांचं नाव पोहोचलं. गायक-संगीतकार हिमेश रेशमियाने रानू यांना चित्रपटात पार्श्वगायन करण्याची संधीसुद्धा दिली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं गाणाऱ्या रानूंची गुगल ट्रेण्डमध्ये लतादीदींशी स्पर्धा होऊ लागली आहे.

मागच्या ३० दिवसांचा गुगल ट्रेण्ड पाहिल्यास रानू मंडल यांच्याविषयीचा गुगल सर्च लतादीदींइतकंच होऊ लागला आहे. ऑगस्टच्या अखेरीस तर रानू यांचा सर्च लतादीदींपेक्षाही जास्त आहे. महाराष्ट्रासोबतच, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड या राज्यांमध्ये रानू यांच्याविषयीचा सर्च सर्वाधिक होऊ लागला आहे.

रानू यांच्या गाण्याच्या शैलीवर लता मंगेशकर यांनी टीका केली होती. “मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचे भले झाले तर मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र कोणाची नक्कल करुन मिळणारी प्रसिद्धी दीर्घकाळ टिकत नाही”, असे लता मंगेशकर म्हणाल्या होत्या. त्यावर “मी कोणाच्याही आवाजाची नक्कल केली नाही. मी माझ्याच आवाजात गाणे गायले आहे. असे म्हणत राणू मंडल यांनी लता मंगेशकर यांना उत्तर दिले.