अनेक वेळा अगदी सामान्य वाटणारी व्यक्ती सोशल मीडियावर कशी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आजवर याच सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्यामुळे अनेक जण रातोरात सेलिब्रिटी झाल्याची उदाहरणं आहेत. त्यातलंच एक नवी उदाहरण म्हणजे रानू मंडल. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं म्हणून उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांच्या सुरेल आवाजाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आणि त्यांचा व्हिडीओ तुफान लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे रातोरात स्टार झालेल्या रानू यांना संगीतकार-गायक हिमेश रेशमियासाठी गाणं म्हणण्याची संधी मिळाली. तेव्हापासून प्रकाशझोतात आलेल्या रानू यांच्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. त्यातच आता त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी एक माहिती समोर आली आहे. रानू यांचं दोनदा लग्न झाल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रानू मंडल यांचं दोन वेळा लग्न झालं असून त्यांचे दोन्ही संसार फार काळ टिकू शकले नाहीत. रानू यांचं पहिलं लग्न पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीसोबत झालं होतं. लग्नानंतर संसाराला हातभार लागावा म्हणून त्या एका क्लबमध्ये गाणं गात असे. यावेळी त्या केवळ २० वर्षांच्या होत्या. त्यांच्या आवाज त्या काळी अनेकांच्या पसंतीत उतरत होता. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. त्यांची हिच लोकप्रियता त्यांच्या पतीला आणि सासरकडील मंडळींना खटकू लागली. परिणामी, त्यांच्या पतीने रानू यांच्यापासून फारकत घेतली. त्यांना एक मुलगा आणि मुलगीदेखील आहे.

वाचा :  कर्करोगावर मात केल्यानंतर शरद पोंक्षेंचं थेट रंगभूमीवर पुनरागमन

पहिल्या पतीने सोडून दिल्यानंतर रानू २००० साली मुंबईमध्ये आल्या. येथे आल्यानंतर त्या फिरोज खान या सुपरस्टारकडे काम करत होते. यावेळी त्यांची ओळख बबलू मंडलसोबत झाली. बबलूदेखील पश्चिम बंगालमधील होता. या दोघांनी लग्न केलं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. २००३ मध्ये बबलूचं निधन झालं.

दरम्यान, बबलूचं निधन झाल्यानंतर त्या पुन्हा पश्चिम बंगालमध्ये परतल्या आणि रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी गाणं गाऊ लागल्या. विशेष म्हणजे १० वर्ष असंच आयुष्य जगत असलेल्या रानू यांचा आवाज अतींद्र चक्रवर्ती या सॉफ्टवेअर इंजिनिअरने राणाघाट ऐकला आणि त्याने रानू यांच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे.