इटलीत दोन दिवस पारंपरिक कोकणी आणि सिंधी पद्धतीनं विवाह पार पडल्यानंतर बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं दीपिका आणि रणवीर लवकरच मुंबईत परतणार आहे. या जोडप्याच्या स्वागतासाठी रणवीरच्या मुंबई येथील घरात जोरदार तयारी सुरू आहे. नववधूच्या स्वागतासाठी रोषणाई आणि फुलांनी घर सजवण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे दीपिकाला आवडेल अशी खास पांढऱ्या फुलांची सजावट यावेळी घराला करण्यात आली आहे. फक्त इमारतीलाच नाही तर रस्त्यावरदेखील आकर्षक अशी रोषणाई रणवीरच्या कुटुंबींयांनी दीपिकाच्या स्वागतासाठी केली आहे. १४ नोव्हेंबरला कोकणी तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीनं हे दीपिका-रणवीर विवाहबंधनात अडकले. याच आठवड्यात दीपिका आणि रणवीर मुंबईत परतणार असून त्यांना पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत.

इटलीतील एका आलिशान व्हिलामध्ये दीपिका रणवीरचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी काही मोजकेच लोक लग्नासाठी उपस्थित होते. भारतात परतल्यानंतर दीप-वीरनं बंगळुरू आणि मुंबईत आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी रिसेप्शन पार्टीचंदेखील आयोजन केलं आहे.