‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या पोस्टर्समुळे अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांची सध्या चित्रपटवर्तुळात प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि त्यातून झळकणारी वाणी व रणवीरची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. असे असतानाच रणवीर मात्र आणखी एका कारणाने सोशल मीडिया गाजवत आहे असेच म्हणावे लागेल. ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून अभिनेता रणवीक सिंग स्वित्झर्लंडमध्ये सुखद सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
सुट्टीच्या मूडमध्ये असणारा रणवीर ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही तितकाच सक्रिय आहे. त्याच्या या सुट्टी दरम्यानच्या काही मजेशीर क्षणांचे फोटो रणवीरने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे रणवीर पुढे अजून काय करणार याकडे त्याच्या चाहत्यांचे नेहमीप्रमाणेच लक्ष लागलेले असते. म्हणूनच आता चर्चा आहे ती रणवीरने स्वित्झर्लंडमध्ये केलेल्या ‘पॅराग्लाइडिंग’ची. भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आणि तसेच साजेसे कॅप्शन देत रणवीरने त्याचा ‘पॅराग्लाइडिंग’चा व्हिडिओ शेअर केला आहे. एका वेगळ्याच प्रकारचे अस्मानी स्वातंत्र्य अनुभवत रणवीरने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या प्रचंड गाजतोय. या व्हिडिओच्या आधी रणवीरने शाहरुख खानच्या ‘तू मेरे सामने’ गाण्यावर ताल धरत स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित डोंगर रांगांमधला एक व्हिडिओही शेअर केला होता. अनेक अतरंगी फोटो, आणि विविधरुपी रणवीरचे दर्शनच जणू त्याच्या या स्वित्झर्लंड सफरीतून समोर आले आहे. दरम्यान, रणवीरच्या बहुचर्चित ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले असून ९ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Freedom of a different kind ! Happy #IndependenceDayIndiahttps://t.co/139FgBrvdu
— Ranveer Singh (@RanveerOfficial) August 15, 2016