कोणत्याही युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती, सेनापतींनी आखलेल्या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्या अनुषंगाने मुत्सद्देगिरीने श्रेष्ठ युद्धनीती आखणारा सेनापती युद्धातील विजयावर शिक्कामोर्तब करत असतो. ही बाब भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या माणेकशा यांच्या कामगिरीचा गौरव ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजी’ फेम दिग्दर्शिका मेघना गुलजार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

मेघनाने या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंगकडे विचारणा केली आहे. तर रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून एखादी लक्ष वेधून घेणारी कहाणी सांगितली जाणे ही फार मोठी जबाबदारी असल्याचे मेघना म्हणतात. फील्ड मार्शल मानेकशा यांच्यासारख्या पराक्रमी सेना अधिकाऱ्याची कहाणी अवघ्या दोन तासांच्या अवधीमध्ये प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हे काम अवघड असल्याचंही त्या म्हणाल्या.

सध्या या चित्रपटाच्या पटकथेच्या लेखनाचे काम सुरु असून, ही कथा एका व्यक्तीवर आधारित असल्याने त्याबद्दल खूप संशोधन करणे आवश्यक असल्याचे मेघना म्हणाल्या. या चित्रपटातील काही भागामध्ये १९७१ सालच्या युद्धाचा काळ दर्शविला जाणार आहे. मानेकशा यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या परिवारजनांनाही भेटणार असल्याचे मेघना गुलजार म्हणाल्या.