अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने सुशांतची आत्महत्या नसून हत्याच आहे असं म्हणत कलाविश्वातील गटबाजी आणि घराणेशाही यावर निशाणा साधला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजी आणि मक्तेदारीवरुन नवा वाद सुरु झाला आहे. अनेक कलाकारांनी त्यांना आलेले अनुभव आणि मनातील खदखद व्यक्त केली आहे. यातच अभिनेता रणवीर शौरीनेदेखील त्याला आलेल्या अनुभवांचं कथन केलं आहे. एकेकाळी माझ्यावर देश सोडायची वेळ आली होती, असं रणवीरने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला रणवीर शौरी सध्या चांगलाच चर्चेला जात आहे. मध्यंतरी त्याच्यात आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे रणवीर सध्या चर्चेत आहे. यातच त्याने ट्विटरच्या माध्यमातून त्याची मनातील खदखद व्यक्त केली आहे.

“मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही. कारण माझ्याकडे कोणता पुरावा नाही. परंतु, मी या विषयावर बोलतो कारण या सगळ्याचा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. एकटं पाडणं, दुषणं लावणं, प्रसारमाध्यमांमध्ये अफवा पसरवणं, याचा अनुभव मी घेतला आहे. २००३-०५ पर्यंत या दोन वर्षात मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. आज ज्यांची नाव समोर येत आहेत, त्याच लोकांनी माझ्यासोबत हे सगळं केलं. परंतु, माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्यासोबत होते म्हणूनच मी या सगळ्यातून बाहेर पडू शकलो. एक काळ असा होता की माझ्याविषयी फार नकारात्मकता पसरवली गेली होती, त्यामुळे माझ्यावर देश सोडण्याचीही वेळ आली होती. तर हा योगायोग होता?- नाही. हे जाणूनबुजून करण्यात आलं होतं”, असं ट्विट रणवीरने केलं आहे.

दरम्यान,या ट्विटनंतर रणीवर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याला या व्यक्तींच्या नावाचा खुलासा करण्यास सांगितलं. परंतु, यावर रणवीरने मौन बाळगणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून रणवीर चांगलाच चर्चेत येत आहे. २००२ मध्ये ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘खोसला का घोसला’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’, ‘भेजा फ्राय’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिथ्या’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.