मतदान करणं हा आपला हक्क असतो. अन् आपण तो बजावायलाच हवा असं प्रत्येक निवडणूकीच्या वेळी ओरडून सांगितलं जातं. मात्र तरीही काही लोक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाही. ही अवस्था केवळ भारतातच नाही तर अमेरिकेत देखील आहेत. हॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार स्नूप डॉग याने आजवर कधीही मतदान केलेलं नाही. या वर्षी आयुष्यात पहिल्यांदा तो मतदान करणार करणार आहे.

येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत निवडणूक होणार आहे. या निवडणूकीचा प्रभाव आता सर्वत्र दिसू लागला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्नूप डॉग याने रिअल ९२.३ या रेडिओ वाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने चकित करणारं वक्तव्य केलं. यंदा आयुष्यात पहिल्यांदाच तो मतदानासाठी घराबाहेर पडणार आहे.

आजवर त्याने मतदान का केलं नाही?

प्रत्येक निवडणूकीच्या वेळी मी मतदान करण्याचा विचार करायचो परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे मला मतदानाचा हक्क मिळत नव्हता. १९९७ साली वर्णद्वेषी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे माझ्यावर गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर असाच प्रकारचा आरोप २००७ साली झाला. या आरोपांमुळे मला मतदानापासून वंचित राहावं लागलं. परंतु यावेळी मी मतदान करणार आहे. आयुष्यातील पहिल्या मतदानासाठी मी उत्सुक आहे. अशा प्रकारचं स्पष्टीकरण स्नूप डॉगने या मुलाखतीत दिलं.