‘एपिक’ या पूर्णपणे इतिहासाला वाहिलेल्या वाहिनीने आत्तापर्यंत पौराणिक मालिकांवर असलेली भिस्त सोडून खऱ्याखुऱ्या इतिहासाचे चित्रण करण्याचा निर्णय घेत एक पाऊल पुढे टाकलं आहे. कोटय़वधींची उलाढाल करणाऱ्या या मनोरंजन क्षेत्राची सुरुवात ज्यांनी केली ते चित्रपटकर्मी आणि स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी उभं केलेलं सेल्यूलॉइडचं साम्राज्य याचा वेध घेणारी ‘ख्वाबों का सफर विइथ महेश भट’ ही नवी मालिका वाहिनीने आणली आहे. फिल्मी दुनियेच्या इतिहासाची सफर घडविण्याचं, त्यांची गोष्ट सांगण्याची जबाबदारी वाहिनीने दिग्दर्शक महेश भट यांच्यावर सोपवली आहे. यानिमित्ताने बोलताना, मला स्वत:ला माझ्या पूर्वसुरींना समजून घेण्याची संधी या शोमुळे मिळाली, अशी मनमोकळी कबुली देणाऱ्या महेश भट यांनी आजची पिढी इतिहासापासून दूर जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. आपलं भविष्य उज्ज्वल घडवायचं असेल तर इतिहासात डोकावलंच पाहिजे, असा आग्रही मुद्दा त्यांनी मांडला.

छोटय़ा पडद्यावर सूत्रसंचालन ही महेश भट यांच्यासाठी नवीन गोष्ट नाही. याआधी त्यांनी ‘दूरदर्शन’वर लहान मुलांसाठी ‘टर्निग पॉइंट’ हा विज्ञानावर आधारित शो केला होता. ‘हकिकत’ हा गुन्हेगारी जगताचा वेध घेणारा शो केला होता. पण, माझ्याच (मनोरंजन) क्षेत्राचा इतिहास धांडाळून पाहणारा शो मी पहिल्यांदाच करतो आहे, असं ते म्हणतात. या शोचे निर्माता-दिग्दर्शक समर खान यांनी जेव्हा सांगितलं की आपल्या देशातील चित्रपट निर्मात्यांवर एक कार्यक्रम करायचा आहे. त्यांचा इतिहास, त्यांच्या संघर्षांच्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या आहेत तेव्हा तो विचार मला आवडला. आज असं झालं आहे की इतिहासाशी असलेली आपली नाळ तुटत चालली आहे. आणि ज्या लोकांच्या स्मृतीच मिटून जातात. ज्यांना त्यांच्या इतिहासाची काहीच ओळख नसते, अशा व्यक्ती किंवा असा समाज हा आजारी माणसांसारखाच असतो. आपली अवस्था ही आजारी माणसांसारखी झाली आहे, असं ते म्हणतात. टीव्हीच्या युगात आपल्या आठवणी फार वेगाने गायब होता आहेत. अशा वेळी आपल्या मनोरंजन क्षेत्राची सुरुवात कशी झाली होती, का झाली होती, हे पाहणं गरजेचं झालं आहे, असं आपल्याला वाटत असल्याचं भट यांनी सांगितलं.

आपण जे बनू पाहतो आहोत ते योग्य आहे की नाही, हे समजून घ्यायचं असेल तर मुळात आपण कसे होतो हे पाहणं आवश्यक ठरतं. ‘ख्वाबों का सफर विइथ महेश भट’ या मालिकेतून जेव्हा आपण ‘प्रभात’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘आर. के. स्टुडिओ’ या स्टुडिओंचा इतिहास पाहतो तेव्हा याभव्यदिव्य स्टुडिओची उभारणी करणारी माणसे किती धाडसी होती हे जाणवल्याशिवाय राहत नाही. कुठलाही दिशादर्शक नाही, आराखडा नसतानाही त्यांनी केवळ आपल्या वेडापायी, ध्यासापायी सिनेमा उद्योग इथे रुजवला. त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. ‘बॉलीवूड’ नामक विहिरीतलं पाणी जे आम्ही आज चाखतो आहोत ती विहीर आमच्या या पूर्वजांनी खणलेली आहे, ही भावना सतत मनात घर करून राहते. त्यामुळे या शोच्या माध्यमातून त्यांच्या विचारांशी, संवेदनांशी जोडून घेण्याची एक अनमोल संधी मिळाली होती आणि ती आपण वाया जाऊ दिली नाही, असं ते मनापासून सांगतात.

या शोच्या संकल्पनेच्याच प्रेमात पडलेले भटसाहेब आपल्या या प्रेमाची कारणमीमांसाही तितक्याच सहजतेने करतात. तुम्ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कहाणी ऐकली आहे?, या प्रश्नाचं उत्तरही त्यांना माहिती असल्याने ते स्वत:च पुन्हा सुरुवात करतात. गरीब घरातून आलेला हा तरुण, त्याच्या डोळ्यावर भूल होती ती या जादूई सिनेमाची. कुठे सुरुवात केली त्यांनी.. कोल्हापूरमध्ये काम करत होते. तिथून ते पुण्यात आले. मग ‘प्रभात स्टुडिओ’ची कथा त्यांच्याबरोबर सुरू झाली. पुण्याहून ते असे मुंबईत आले आणि मग ‘राजकमल’सारखा भव्य स्टुडिओ उभा करत इथेच स्थिरावले. हा प्रवास त्यांच्या नजरेतून के लात तर त्यांच्या सिनेमात दिसणारी लोकं, त्यांच्या कथा याचं बीज तुम्हाला सापडेल, असं ते सांगतात. ‘न्यू टॉकीज’ची दास्ताँ कुठे सुरू झाली? हिमांशू राय ते तिथे बंगालमध्ये होते. ते आणि देविकाराणी एकत्र आले. आज देविकाराणींचं योगदान कितीजणांना माहिती आहे, या क्षेत्रातील पहिली कर्तृत्ववान महिला जिचा सन्मान ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार देऊन करण्यात आला. त्यांच्या विचारांना, मतांना त्या काळी या क्षेत्रात असलेले महत्त्व पाहिल्यावर थक्क व्हायला होते, असे सांगणारे भटसाहेब आपल्या पूर्वसुरींच्या तुलनेत चित्रपटकर्मी म्हणून झालेला आपला प्रवास फारच सुखकारक होता असे मानतात.  ‘आमच्या पिढीचं छान होतं. आम्ही स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलो आणि राज कपूर, गुरुदत्त यांचे चित्रपट बघत मोठे झालो. पण, त्याआधीचा एक काळ असा आहे ज्याकडे आपण कधी फारसं लक्ष दिलेलं नाही. त्या काळाला आपण कधी महत्त्वच दिलेलं नाही,’ असं ते म्हणतात. आजच्या चित्रपटकर्मीपेक्षा दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम, हिमांशू राय यांच्यासारखे अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शकही हिंमतवान होती. प्रवाहाविरुद्ध पोहोण्याची ताकद त्यांच्यात होती. पारतंत्र्यात राहून स्टुडिओची निर्मिती, चित्रपट निर्मितीसारखा अवघड व्यवसाय यशस्वी करणं हे खचितच सोपं नव्हतं, असं मत भटसाहेब यांनी व्यक्त केलं.

मेहबूब स्टुडिओ आणि राज खोसला

या शोचे सूत्रसंचलन करताना महेश भट स्वत: प्रत्येक स्टुडिओत फिरले आहेत. जुने संदर्भ नव्याने तपासून त्यांचे किस्से त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत. मात्र, हे करत असताना दिग्दर्शक म्हणून त्यांचा प्रवास ज्या स्टुडिओपासून आणि व्यक्तीपासून सुरू झाला त्याची आठवण त्यांनी सांगितली. माझे भावबंध जुळले ते दिग्दर्शक राज खोसला यांच्याशी. ते माझे गुरू होते. ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट सपशेल आपटला तेव्हा ते ओरडत आले होते. ती त्यांच्याबद्दलची माझी पहिली आठवण. ते गुरुदत्त यांचे साहाय्यक होते. त्यानंतर कित्येक वेळा आमच्या गाठीभेटी झाल्या. पण, त्यांची ती मिजाशी वृत्ती, बोलण्याची लकब या सगळ्या गोष्टी कायम माझ्याबरोबर राहिल्या आहेत.

माझ्या ‘नाम’ या चित्रपटाच्या वेळी पुरस्कार देण्यासाठी ते आले होते. राजेंद्र कुमार यांनी खास त्यांना बोलावून घेतलं होतं. माझा आणि त्यांचा एकत्र प्रवास हा मेहबूब स्टुडिओतून सुरू झाला. पण, त्यांच्या निमित्ताने मग अनेक गोष्टी ओघाने जोडत गेल्या. राज खोसलांना दिग्दर्शक म्हणून पुढे आणलं देव आनंद यांनी.. त्यामुळे साहजिकच देव साहेबांच्या गप्पा, चेतन आनंद यांना पाहिलं होतं. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दलच्या चर्चा आणि विजय आनंद यांच्याबरोबर ऊठबस असल्याने त्यांच्याकडून मिळालेल्या गोष्टी अशी ती कडी एकात एक जोडत पुढची वाटचाल झाली, असं महेश भट यांनी सांगितलं. शोचे चित्रीकरण करताना भट यांना  गुरुदत्त यांच्यावरचा भाग जास्त आवडल्याचं त्यांनी सांगितलं.

हिंदी सिनेमा आपल्या मुळांपासून दूर गेला..

आजचा हिंदी सिनेमा हा आपल्या मुळांपासून दूर गेला आहे. आज मराठी, बंगाली आणि गुजराती असे प्रादेशिक चित्रपट यशस्वी होत आहेत. कारण, ते त्यांच्या संस्कृतीपासून दूर गेलेले नाहीत. ‘दगडी चाळ’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होतो आणि सव्वा कोटींचा व्यवसाय करतो कारण ती चाळ मुंबईतली आहे, महाराष्ट्रातली आहे. लोकांना त्या चित्रपटाचा आपल्याशी असलेला संदर्भ महत्त्वाचा वाटतो. हिंदीचे तसे नाही. तो आपला वाटतच नाही. हिंदी चित्रपटांमध्ये नव्याने प्राण फुंकण्याची गरज आहे.
 – महेश भट