कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली, एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेली ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचं कळतंय. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. या मालिकेला सुरुवातीला विरोध झाला खरा पण तरीही दोनशे भागांच्या टप्प्यापर्यंत ही मालिका पोहोचली होती. झी मराठी वाहिनीवर आता पुन्हा एकदा ही मालिका सुरू होणार असल्याची चर्चा असून नाईकांच्या वाडय़ातील घडणाऱ्या घटनांचे रहस्य उलगडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

झी मराठीच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवर एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. हा प्रोमो आणि त्यातील पार्श्वसंगीतावरून ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव अशा अनेक मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यामुळे हा प्रोमो पाहताच चाहत्यांनी सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचं नाव घेतलं आहे.

वाचा : भन्साळींच्या चित्रपटासाठी सलमान-अनुष्का पुन्हा येणार एकत्र

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप घेत मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या मालिकेत ज्याप्रकारे कोकणातील भूताखेतांच्या कथांचे चित्रण करण्यात आले आहे त्यामुळे लोकांत कोकणाबद्दलचे गैरसमज वाढीस लागतील, असा आरोप करण्यात आला होता.