अनेक वर्षांनंतरही रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा प्रसारित केली जात असून आताही ‘रामायण’ टीआरपीचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. या मालिकेसोबतच पुन्हा एकदा त्यातील कलाकारांची चर्चा सुरू झाली. ‘रामायण’मधील कलाकार आता कसे दिसतात, ते काय करतात याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. या मालिकेत अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली. त्यांची हसण्याची शैली, चालणं-बोलणं चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की ते खऱ्या आयुष्यात असीम रामभक्त आहेत.

अरविंद त्रिवेदी आता ८२ वर्षांचे आहेत. मालिकेत जरी त्यांनी रावणाची भूमिका साकारली असली तरी खऱ्या आयुष्यात ते दिवसरात्र रामनामाचा जप करतात. टीव्हीवर पुन्हा एकदा ‘रामायण’ सुरू झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. इतकंच नव्हे तर ते भावूकसुद्धा झाले. अरविंद यांना मालिकेत रावणाची भूमिका साकारायची नव्हती. त्यांनी स्वत: एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. त्यांना केवट ही भूमिका साकारायची इच्छा होती. केवट यांनी आपल्या नावेत प्रभू श्रीराम यांना गंगेच्या पलीकडे सोडले होते.

‘रामायण’ मालिकेत रावणाची भूमिका साकारल्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये खलनायकांच्या भूमिकांचे ऑफर्स येऊ लागले होते. यांनी ‘विक्रम और वेताल’ या हिंदी चित्रपटासह काही गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं. अरविंद त्रिवेदी हे सध्या मुंबईत राहतात.