News Flash

चित्रपटाला संगीत द्यायला आवडेल..

पुन्हा तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून चित्रपट करताना तरुणाईचं एक वेगळं रूप ‘रंपाट’मध्ये पाहायला मिळतंय.

|| भक्ती परब

‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘बेंजो’, ‘न्यूड’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक रवी जाधव ‘रंपाट’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना तरुणाईची स्पंदने ओळखणाऱ्या या दिग्दर्शकाला अजून कोणते विषय, कोणतं वेगळं माध्यम खुणावतंय आणि ‘रंपाट’च्या निर्मिती मागची नेमकी गोष्ट काय? हे जाणून घेण्याच्या हा प्रयत्न..

पुन्हा तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून चित्रपट करताना तरुणाईचं एक वेगळं रूप ‘रंपाट’मध्ये पाहायला मिळतंय. या चित्रपटाची कथाकल्पना नेमकी काय?, असं विचारल्यावर रवी जाधव म्हणाले, ‘टाइमपास’ चित्रपट यशस्वी झाल्यानंतर मला खूप मुलांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवरून मिळाल्या. आम्हालाही चित्रपटात काम करायचं आहे, असं काहींच म्हणणं होतं. प्रामुख्याने ही गावाकडची मुलं होती. यातूनच ‘रंपाट’ साकारला. गावाकडच्या मुलांना नवं स्वप्न सापडलंय, त्यांना चित्रपटात काम करायचाय, त्यांना कलाकार व्हायचं आहे. त्यांची अशी धारणा आहे की इतर व्यावसायात काम करण्यासाठी पैसा लागतो, पण कलाकार व्हायला नशीब लागतं. त्यामुळे या भाबडय़ा स्वप्नांच्या पाठीमागे धावताना गावातून मुलं मुंबईला यायला लागली आहेत. मग मुंबईत आल्यावर त्यांचं काय होतं? इथे आल्यावर त्यांना काम मिळतं का? ते एका रात्रीत स्टार बनतात का? त्यामागे किती मेहनत, अभ्यास असतो? आणि ‘रंपाट’ म्हणजे फास्ट (जलद) तर आपलं स्वप्न ‘रंपाट’ पणे पूर्ण करणं त्यांना जमतं का?, अशा प्रश्नांची उत्तरे आणि या मुलांच्या संघर्षांची ही गोष्ट आहे.

कलाकारांच्या निवडीविषयी त्यांनी सांगितलं, कथेतील व्यक्तिरेखांसाठी कलाकारांची निवड करताना मी कधीच ऑडीशन घेतल्या नाहीत. कथेतल्या व्यक्तिरेखेनुसारच निवड करत गेलो. त्यामुळे अभिनय बेर्डे, कश्मिरा परदेसी, प्रिया बेर्डे, अभिजीत चव्हाण, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे, वैभव मांगले आणि कुशल बद्रिके या कलाकारांची निवड चित्रपटाच्या कथेला साजेशी झाली आहे. प्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डे ही मायलेकांची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे.

पहिल्या चित्रपटापासून ते आत्ता ‘रंपाट’पर्यंत दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांनी खूप वेगवेगळे विषय चित्रपटातून हाताळले आहेत. त्याविषयी विचारलं असता ते म्हणाले, आपण मराठी भाषिक खूप नशीबवान आहोत. आपल्या आजुबाजूला खूप साहित्य असून नाटकांचं दालनही समृद्ध आहे. ऐतिहासिक वारशामुळे तशा पद्धतीच्या चित्रपटांसाठी व्यक्तिरेखाही तसेच आपल्या भोवतालीही असे अनेक विषय आहेत की त्यावर चित्रपट बनू शकतात. त्यातल्याच एखाद्या विषयाची निवड करतो. त्या विषयाचा अनुभव मला असेल, त्यातून मी गेलो असेन तर चित्रपटाला मी उत्तम न्याय देऊ  शकेन, असं मला वाटतं. ‘रंपाट’चा विषय असाच होता. हा विषय माझ्या अगदी जवळचा होता. चित्रपटसृष्टीत आलो तेव्हा मलाही मुलांकडून विचारणा व्हायची, तेव्हाही मला त्यांना सांगायचं असायचं की या क्षेत्रात येण्यासाठी शाळेपासूनच सुरुवात व्हायला हवी.

‘रंपाट’मध्येही ही दोन मुलं चित्रपटात काम मिळण्यासाठी वेगळ्या पद्धतीने संघर्ष करतात. पण त्यांची निरागसता पाहून एका बाजूला दया आणि दुसऱ्या बाजूला हसूही येतं. या चित्रपटाची गाणी आणि संवादही लोकप्रिय ठरताहेत.  ‘न्यूड’ हा चित्रपट अतिशय संवेदनशील, एका नाजूक विषयावरचा होता. त्याउलट ‘रंपाट’ हा अत्यंत हलकाफुलका चित्रपट असून सर्व स्तरातील प्रेक्षकांना तो आवडेल. दिग्दर्शन, निर्माता, लेखन आणि अभिनेता अशा विविध भूमिका तुम्ही साकारल्या आहेत, त्यातील कुठली भूमिका सर्वाधिक जवळची वाटते? या प्रश्नावर जाधव म्हणाले, मला लेखन करायला खूप आवडतं. म्हणूनच प्रत्येक चित्रपटाच्या पटकथा लेखनात माझा सहभाग असतोच.  लेखन-दिग्दर्शनापलीकडे मला स्वत:ला संगीत खूप आवडतं. चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचा प्रवास मी लक्ष देऊन पाहतो. चित्रपटातील प्रत्येक गाण्यात रमतो. गीतलेखन सुरू असताना तिकडेही माझं लक्ष असतं. संगीत प्रवासात खूप रस घेतो. त्यामुळे येत्या काळात कुणी संधी दिली तर एखाद्या चित्रपटाला संगीत द्यायला मला खूप आवडेल. . या चित्रपटातील संगीताच्या निमित्ताने मराठीतसुद्धा रॅप संस्कृती येऊ  शकेल का?, यावर त्यांनी सांगितलं, मराठी भाषेतील शब्द रॅप करणे थोडे कठीण जाते. या आधी मराठीतील काही रॅप ध्वनीचित्रफिती पाहिल्या होत्या. पण त्यापेक्षा मला या चित्रपटात काहीतरी वेगळं द्यायचं होतं. रॅपमध्ये एक अ‍ॅटिटय़ूड असतो. ते अतिशय आत्मविश्वासाने मांडलेलं असतं. त्यात काहीतरी सांगणं असतं. मुळात हा प्रकार पाश्चात्त्य देशात उदयाला आला. तिथल्या विशिष्ट वर्गाला त्यांचं म्हणणं मांडायचं होतं. त्यात वर्णद्वेष, गरीब-श्रीमंत दरी याबद्दलची भावना व्यक्त करण्यासाठी रॅप हे त्यांच्या आवाक्यातलं माध्यम होतं. त्यामध्ये चालीपेक्षा शब्दांना जास्त महत्त्व असतं. सध्या मराठी मुलांचा अ‍ॅटिटय़ूड काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, ते रॅपमधून यावं, हा विचार होता. ते करण्याची संधी ‘रंपाट’मुळे मिळाली. या रॅप गाण्यावरून प्रेरणा घेऊन अजून काही मराठी रॅप गाणी पुढे येतील असं वाटतं.

वेबसीरिज हे वैश्विक माध्यम आहे. त्यामुळे मला कोणती मराठी गोष्ट जगाला सांगायला आवडेल, त्याचा आधी विचार करेन. अत्यंत मराठमोळी, मराठी माणसाची गोष्ट मला वेबसीरिजमधून मांडायला आवडेल. ही गोष्ट अतिशय तरल, नाजूक हृदयस्पर्शी अशीच असेल.    – रवी जाधव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 1:07 am

Web Title: ravi jadhav
Next Stories
1 ट्रान्स अफेअर वेगळ्या लिंगभावाची वेदना
2 हायस्कूलमधले प्रेमशिक्षण
3 सावळा गोंधळ
Just Now!
X