माझा सिनेमा बनविण्याआधी सिनेमाचे पोस्टर तयार होते, त्यानंतर सिनेमा तयार होतो. माझ्या दिग्दर्शनाची हीच पद्धत आहे. जाहिरातीत काम करून नंतर अभिनेता आणि आता निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. एखादे काम हाती घेतल्यास त्यावर विश्वास ठेवा आणि मग जिंकून दाखवा यासाठी मी प्रयत्नशील असतो, असे प्रतिपादन दिग्दर्शक रवी जाधव यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
वेध अकादमीच्या वतीने नाटय़कार्यशाळा भरविण्यात येत आहे. या अंतर्गत दर रविवारी एका सिने कलाकाराची भेट कार्यशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी घडवून आणली जाते. रविवारी दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुलांची भेट घेतली. त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत त्यांनी मुलांच्या शंकाचे निरसन केले. मनोरंजनच्या क्षेत्रात आपल्याला जायचे असेल तर काय शिक्षण घेणे आवश्यक आहे याचे त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कथा सुचण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. तसेच समोरील घटनांकडे लिखाणाच्या माध्यमातून कसे पाहायचे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
स्वत: विषयीची माहिती मुलांना देताना त्यांनी सांगितले, वडिलांची प्रेरणा महत्त्वाची ठरली. आयुष्यात काहीतरी वेगळे काम कर असे ते सतत म्हणायचे. त्यांच्यासोबतच पत्नीचा पाठिंबा असल्याने आज मी इथे पोहोचलो आहे. तसेच मी जे तत्त्व पाळतो ते तत्त्व तुम्हीही अमलात आणा असे सांगत त्यांनी मुलांना कानमंत्रच दिला.