भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्यासाठी कलाकारांची तयारी जोरदार सुरू आहे. यामध्ये रणवीर सिंग तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. धर्मशालाच्या मैदानावर सध्या कलाकारांची फौज आणि रिअल लाइफ क्रिकेटर्स यांच्यात सामना रंगतोय. तेव्हाच्या विश्वचषकातील भारतीय संघाचे खेळाडू कलाकारांना क्रिकेटचे धडे देत आहेत. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

कपिल देव हे रणवीरला गोलंदाजी, फलंदाजीचे कसब शिकवत आहेत. कलाकारांनी क्रिकेटची पूर्ण टीमच तयार केली आहे. सर्वजण मिळून घाम गाळताना या व्हिडिओत दिसत आहेत. तत्कालीन इंडिया टीमचे उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकीब सलीम दिसणार आहे. मोहिंदर हे साकीबला प्रशिक्षण देताना दिसत आहेत. पडद्यावर विश्वचषकाचा इतिहास हुबेहूब साकारता यावा यासाठी प्रत्येक कलाकार मेहनत घेत आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ८३ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजला क्लीन बोल्ड केलेल्या बलविंदर सिंग यांची भूमिका एमी विर्क वठविणार आहे. क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील करणार आहे.

सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर भसीन व यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना वठविणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पीआर मान सिंग यांची भूमिका पंकज त्रिपाठी करणार आहे. १९८३ मध्ये मान सिंग वर्ल्ड कप टीमचे मॅनेजर होते.