काही सिनेमांच्या नावांवरुनच आपण तो सिनेमा कोणता तसेच सिनेमात कोणत्या कलाकारांनी काम केले आहे ते ओळखतो. अशा अजरामर सिनेमांमध्ये ‘हम आपके है कौन’ या सिनेमाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. या सिनेमाचा रिमेक यावा असे अनेकांना वाटते. यात आता अभिनेत्री रेणुका शहाणेचीही भर पडली आहे. जर ‘हम आपके है कौन’ सिनेमाचा रिमेक झालाच तर वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनी सलमान खान आणि माधुरी दीक्षितची व्यक्तिरेखा साकारावी असे रेणुकाला वाटते.
सिनेमाच्या रिमेकबद्दल बोलताना रेणुका म्हणाली की, ‘तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून ‘हम आपके है कौन’ सिनेमाची निर्मिती पुन्हा करायची झाली तर मला या सगळ्या व्यक्तिरेखा मॉर्डन अंदाजात पाहायला आवडेल. हा एक कौटुंबिक सिनेमा होता. यात प्रत्येकाचेच एकमेकांवर नितांत प्रेम होते. या सिनेमात लग्न, हळद, संगीत मेहंदी या गोष्टींचा भरणा होता. या सर्व गोष्टी आजच्या तरुण पिढीलाही तेवढ्याच आवडतात. त्यामुळे सिनेमाचा विषय अजूनही नवीनच आहे. नव्या धाटणीने आणि मॉर्डन पद्धतीने हा सिनेमा करायचा झाला तर वरुण आणि आलिया ही जोडी या भूमिका चांगल्या पद्धतीने निभावू शकतील असे मला वाटते.
सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे या सिनेमातील टफीचे दृश्य दाखवताना दिग्दर्शकाचा कस लागेल यात काही शंका नाही. सिनेमात, शेवटच्या दृश्यात मोहनीश बहलला पत्र आणून देतो. आताच्या काळात हे दृश्य कसे चित्रीत केले जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सिनेमाचा रिमेक पाहणं फार मजेशीर असेल यात काही शंकान नाही, असे रेणुका म्हणाली. तसेच या सिनेमाच्या रिमेकमध्ये पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा रेणुकाने व्यक्त केली. राजश्री प्रोडक्शन हे तिच्यासाठी माहेरासारखे आहे. पण मूळ सिनेमात मला आधीच मेलेले दाखवल्याने रिमेकमध्ये माझ्यासाठी काही काम असेल असे वाटत नाही.