अभिनेता सुशांत सिंहच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर काही गंभीर आरोप केले असून पाटणा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतचे वडील केके सिंह यांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. सुशांत आणि रिया दोघेही नात्यात होते. १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी आत्महत्या केली.
तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”.
सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल
पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “रिया सुशांतसोबत एकत्र राहत होती. आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी तिने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रं सोबत नेली. यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. रियाने आपल्याला धमकावलं असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचं सुशांतने आपल्या बहिणीला सांगितलं होतं”.
“सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 9:51 pm