अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने आपल्याविरोधात फौजदारी तक्रार करणार नसल्याची हमी दिली तरच आपण तिच्यासोबतचा वाद माफी मागून निकाली काढण्यास तयार आहोत, असे अभिनेत्री पायल घोष हिने सोमवारी उच्च न्यायालयाला सांगितले.

पायलच्या या भूमिकेनंतर न्यायमूर्ती अनिल मेनन यांनी रिचा आणि पायलला दोन दिवसांची मुदत देत त्या वाद निकाली काढणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्यांनी इतरांच्या मार्फत बोलण्याऐवजी एकमेकींशी याबाबत बोलावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली.

या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली असता मागील सुनावणीनंतर पायलने आपण रिचाची माफी मागणार नसल्याचे समाजमाध्यमावरून जाहीर केल्याची बाब रिचाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने त्याची दखल घेतली. तसेच पायलला हा वाद निकाली काढायचा आहे की नाही, अशी विचारणा तिच्या वकिलांकडे केली. त्यावर पायल आपले वक्तव्य मागे घेण्यास आणि माफी मागण्यास तयार आहे. मात्र हा वाद निकाली निघाल्यानंतर रिचा आपल्याविरोधात फौजदारी तक्रार करणार नाही या अटीवर ती हे करण्यास तयार असल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर  आरोप करणाऱ्या पायलने या प्रकरणी रिचाबाबतही समाजमाध्यातून आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरोधात रिचाने उच्च न्यायालयात धाव घेत रिचाविरोधात एक कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. मागील आठवडय़ातील सुनावणीच्या वेळी पायलला तिच्या वक्तव्याबाबत पश्चताप असून ती रिचाची बिनशर्त माफी मागण्यासाठी तयार आहे, असे पायलच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने वाद परस्पर सामंजस्याने निकाली काढत असल्याबाबत दोघींना न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.