आपल्या बोल्ड आणि सशक्त अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळा ठसा उमटविणारी अभिनेत्री रिचा चढ्ढाने मोठ्या पडद्यावर द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा प्रकट केली आहे. “मला द्रौपदीची व्यक्तिरेखा खूप भावते. तिची व्यक्तिरेखा साकारायला मला नक्कीच आवडेल. मी लहानपणी महाभारत वाचले असून, मला ते अतिशय आवडते.” अशी भावना तिने व्यक्त केली. अभिनेता वीर दासची बहिण त्रिशाने लिहिलेल्या Ms Draupadi Kuru: After the Pandavas या पहिल्यावहिल्या पुस्तकाच्या अनावरण कार्यक्रमात रिचा बोलत होती. हार्पर कॉलिसने त्रिशाचे हे पुस्तक भारतात प्रकाशित केले आहे. त्रिशाच्या पुस्तक अनावरणाचा आपल्याला अतिशय आनंद झाल्याची भावना रिचाने यावेळी व्यक्त केली. पौराणिक कथांचे वर्तमान रुप अतिशय योग्य प्रकारे पुस्तकात मांडण्यात आल्याचेदेखील ती म्हणाली. या पुस्तक अनावरण सोहळ्यात वीर दाससोबत मानसी स्कॉट, अनुराग श्रीवास्तव, सुचित्रा पिल्लई, श्रुती सेठदेखील उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिचा चढ्ढाची निर्मिती असलेला पहिला चित्रपट ‘खून चली आंधी’चे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये स्क्रिनिंग पार पडले. भारतीय फिल्म फेस्टिव्हलदरम्यान सादर करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी रिचा स्वत: ऑस्ट्रेलियामध्ये उपस्थित होती. ‘बॉलिवूडमध्ये स्त्रिया’ या विषयावर तिने फेस्टिव्हलमध्ये उपस्थितांना संबोधितदेखील केले. हिंदुस्तान टाइम्समध्ये सूत्रांचा हवाला देत देण्यात आलेल्या वृत्तानुसार, इतर तरुणींप्रमाणे रिचालादेखील शॉपिंगची आवड आहे. शॉपिंगसाठी ऑस्ट्रेलिया हे उत्तम ठिकाण आहे. एक दिवस ती एका दुकानात शॉपिंग करत असताना महिला स्टोअर मॅनेजरने रिचाकडे मदतीची मागणी केली. ती खूप घाबरलेली होती, एक व्यक्ती आपल्या मागावर असून त्रास देत असल्याचे तिने रिचाला सांगितले. हे ऐकून ना केवळ रिचाने तिला मदत करण्याचे ठरवले, तर स्टोअर बंद होईपर्यंत ती तेथेच थांबून राहिली. त्यानंतर रिचाने त्या महिला स्टोअर मॅनेजरला खाऊ घातले आणि सर्वकाही ठीक होईल असा विश्वास दिला. त्याचबरोबर पेलिसांकडे तक्रार करण्याचा सल्लादेखील रिचाने त्या महिलेस दिला.