मानसी जोशी

ऐतिहासिक पटांच्या निर्मितीसाठी हा योग्य काळ आहे. गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक पटांनी तिकिटबारीवर जी कमाई केली आहे ते लक्षात घेता हा ट्रेण्ड याही वर्षी कायम राहील, असे सांगतानाच परदेशातील बाजारपेठेतही हिंदी ऐतिहासिक चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे, अशी माहिती लंडनस्थित उद्योजक रोहित शेलटकर यांनी दिली. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये निर्माता म्हणून पदार्पण करणाऱ्या रोहितने गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपटांकडे वेगळा आशय देणारे चित्रपट म्हणून जगभरातील प्रेक्षकांची मान्यता मिळू लागली असल्याचे सांगितले.

परदेशात मराठी प्रेक्षकांचा टक्का कमी असल्याने तेथे कमी मराठी चित्रपट पाहिले जातात. या कारणामुळे मराठी चित्रपट पाहिजे तसा व्यवसाय करत नाहीत. भविष्यात चांगली कथा असल्यास मराठी चित्रपटाची निर्मिती नक्की करेन, असेही रोहित शेलटकर यांनी सांगितले. मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपट परदेशात जास्त पाहिले जातात. गेल्या चार-पाच वर्षांत हिंदी चित्रपट परदेशात वितरित करण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगळे मनोरंजन करणारे कथानक यामुळे जगभरातून हिंदी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे, असे सांगतानाच निर्माता म्हणून ओटीटी माध्यमेही खुणावत असल्याचे त्याने सांगितले. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवरील वेब सिरीज आणि चित्रपट उपलब्ध होतात. यामुळे जगभरातील आशय एका क्लिकवर प्रेक्षकांना उपलब्ध होत असल्याने त्यांना अनेक पर्याय निवडता येतात. यानिमित्ताने ‘व्हिजन वर्ल्ड फिल्म्स’ या आपल्या कंपनीद्वारे मूळ आणि चांगला आशय असलेल्या वेब सिरीजची निर्मिती केली जाईल असेही रोहित म्हणतो.

पहिल्याच प्रयत्नात ‘पानिपत’सारख्या मोठय़ा चित्रपटाची निर्मिती करण्याबद्दलचा अनुभव कसा होता हे सांगताना एवढय़ा मोठय़ा स्तरावर चित्रपटाची निर्मिती करताना निर्मात्याला काही अडचणी येतात. चित्रपटाची आखणी, आर्थिक गणिते जुळणे ही महत्त्वाची गोष्ट असते. चित्रपटाच्या निर्मितीत कलाकारासोबतच निर्माता आणि तेवढय़ाच ताकदीचा दिग्दर्शक लाभणे गरजेचे असते. पानिपत चित्रपटाच्या बाबतीत या तिन्ही गोष्टी जुळून आल्या आणि त्यामुळे चित्रपटाने चांगला व्यवसायही केला, असे त्याने सांगितले.  ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘व्हॉट्स युवर राशी’ याँसारखे यशस्वी चित्रपट देणारया दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत काम करताना मजा आली. या कथेविषयी तो खूप आधीपासून विचार करत होता. लंडनमध्ये मी असताना पानिपत कथेवरील चित्रपट करण्याचे ठरवले तर तेच स्वप्न आशुतोष भारतात पाहून बघत होता. आशुतोष गोवारीकर कोणताही चित्रपट करण्याआधी स्वत: अभ्यास करतात. प्रेक्षकांना पडद्यावर काय दाखवायचे आहे याची त्याला पुरेपूर जाणीव असते. पानिपतच्या कथेवर त्याने एक ते दीड वर्ष सखोल अभ्यास केला. आणि चित्रपट पाहताना याची जाणीव होते, असेही त्याने सांगितले.

रोहित परदेशात चित्रपट वितरणही करत असल्याने त्याचाही चांगला अनुभव त्याच्या गाठीशी आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने पंचवीस चित्रपटांचे परदेशात वितरण केले आहे. भारतीय कथा, आशय हा आपल्या चित्रपटांमधून मूळ पद्धतीनेच तिथे प्रेक्षकांना पाहायला मिळतो. त्यातून भारताची संस्कृती, आताची आधुनिक जीवनशैली या सगळ्या गोष्टी तिथल्या भारतीयांनाच नव्हे तर परदेशी प्रेक्षकांनाही पाहायला मिळतात. त्यामुळे आपला इतिहास, संस्कृती दाखवणारे जास्तीत जास्त चित्रपट तिथे पोहोचायला हवेत, असे मत त्याने व्यक्त केले. परदेशातील वितरणाबरोबरच इथे निर्माता म्हणून आलेल्या वितरण व्यवस्थेच्या अनुभवाबद्दलही त्याने सांगितले. एक वितरक असल्याने चित्रपटाचे तंत्र मला चांगले अवगत आहे. सध्या मराठीत चित्रपटांना प्राइम टाइम आणि थिएटर मिळत नाही असे बोलले जाते. काही अंशी ही सत्य परिस्थिती आहे. नुसते पुरेसे थिएटर मिळून उपयोग नाही तर चित्रपटही मनोरंजक असायला पाहिजे. एक निर्माता म्हणून मराठी चित्रपटाने उत्तरोत्तर प्रगती करावीशी वाटते. वितरकांनी जास्तीत जास्त शोज मराठी चित्रपटांना दिले पाहिजेत. ही संथ गतीने होणारी प्रक्रिया असल्याने थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटांचा एक  विशिष्ट प्रेक्षकवर्ग आहे. अमराठी प्रेक्षकही मराठी चित्रपट मोठय़ा संख्येने पाहात आहेत. हे लक्षात घेऊन वितरण व्यवस्था चोख केली पाहिजे, असे तो म्हणतो.

लवकरच आपल्या निर्मितीसंस्थेंतर्गत एक ऐतिहासिक चित्रपट आणि दोन समकालीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार असून त्यावर काम सुरू असल्याचेही रोहितने स्पष्ट केले.