काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील शेतकरी आंदोलनावर प्रसिद्ध पॉप स्टार रिहानाने ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता तिने तिचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिहानाच्या या टॉपसेल फोटोमध्ये तिने गळ्यात भारतीयांचे आराध्य दैवत गणपतीचे पेडेंट घातले आहे. ते पाहून भारतीयांनी रिहानाला चांगलेचे सुनावले आहे. दरम्यान भाजपा नेते राम कदम यांनी रिहानाच्या या फोटोवर आक्षेप घेतला आहे.

राम कदम यांनी ट्विटरद्वारे रिहानाच्या या फोटोवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ‘रिहानाने आमच्या हिंदू दैवताची खिल्ली उडवली आहे आणि हे फार चुकीचे कृत्य आहे. भारतीय संस्कृती विषयी रिहानाला काही ठावूक नाही, तिला या संस्कृतीबद्दल आदर नाही हे स्पष्ट होत आहे. आता तरी आशा आहे की राहुल गांधी आणि इतर काही काँग्रेस नेते तिची मदत घेणे थांबवतील’ या आशयाचे ट्विट केले आहे.

राम कदम यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ‘रिहानाने नग्न अवस्थेत भगवान गणेशाचे पेडेंट घालून हिंदू देवतांचा अपमान केला आहे. आताही काँग्रेस रिहानाला पाठिंबा देणार का?’ असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.

रिहानाने एका लग्झरी ब्रँडसाठी फोटोशूट केले होते. त्यावेळी तिने टॉपलेस फोटोशूट केले होते. फोटोसाठी पोज देत असताना रिहानाच्या गळ्यात गणपतीचे पेडेंट दिसत आहे. अशा प्रकारचे फोटोशूट करताना गळ्यातील पेडेंट पाहून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तिने हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे.