News Flash

“ठाकूर मित्रा मला कॅन्सर झालाय रे…”, जिवलग मित्राशी बोलताना ऋषी कपूर यांना कोसळलं होतं रडू

ऋषी कपूर यांना आपलं बोलणंही पूर्ण करता आलं नव्हतं

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं नुकतंच निधन झालं. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी लढा देत होते. २०१८ मध्ये त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत गेले होते. त्यानंतर ते पुन्हा भारतात परतले होते. पण अखेर कॅन्सरसोबत त्यांची झुंज अपयशी ठरली. आपल्याला कॅन्सर झाला आहे हे कळल्यानंतर ऋषी कपूर यांना खूप मोठा धक्का बसला होता. आपल्या मित्राला याबद्दल सांगताना तर त्यांना रडू कोसळलं होतं. ऋषी कपूर यांचे जिवलग मित्र असणारे राज यांनी Writersball शी बोलताना ही माहिती दिली.

“त्यांना २०१८ मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं. याबद्दल त्यांच्या कुटुंबाशिवाय इतर कोणालाही माहिती नव्हती. ही सप्टेंबर २०१८ ची गोष्ट आहे. अमेरिकेत उपचारासाठी संध्याकाळी ते निघणार होते. त्यांनी मला त्याच दिवशी फोन केला. मला ते प्रेमाने ठाकूर म्हणायचे. मी फोन घेतला आणि बोलण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी मला तुझ्याशी बोलायचं आहे सांगितलं आणि गप्प बसले. त्यांचा रडण्याचा आवाज मला येत होता. मला काहीतरी झालंय हे लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मला पाच मिनिटांनी फोन कर सांगितलं. मी बरोबर पाच मिनिटांनी फोन लावला आणि चिंटू सगळं काही ठीक आहे ना विचारलं. ते पुन्हा रडू लागले. ठाकूर चांगली बातमी नाहीये. मला कॅन्सर झाला आहे. उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे असं त्यांनी सांगितलं,” अशी माहिती राज यांनी दिली आहे.

राज आणि ऋषी कपूर यांची मैत्री जवळपास तीन दशकांची आहे. ऋषी कपूर यांचं निधन झालं त्याच्या आदल्या दिवशीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं का ? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “नाही…ते चुकीचं वृत्त आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने मलाही आश्चर्याचा धक्का बसला होता. दोनच दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं होतं. ते आपल्या घराबाहेर चालत होते. मी त्यांना घरात जाण्यास सांगितलं होतं. त्यावर त्यांनी चांगली हवा घेण्यासाठी बाहेर आलो असल्याचं म्हटलं होतं”.

“ऋषी कपूर आणि मी त्यावेळी लॉकडाउन, करोना आणि भविष्यावर चर्चा केली होती. आम्ही जवळपास अर्धा तास बोलत होतो. इतका वेळ आम्ही कधीच बोललो नव्हतो. त्यामुळेच ते नाहीयेत यावर माझा विश्वास बसत नाही,” असं राज यांनी म्हटलं आहे.

राज यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, “करिअरच्या सुरुवातीला जेव्हा ऋषी कपूर रोमँटिक हिरोच्या भूमिका करायचे तेव्हा नेहमी म्हणायचे आम्ही अभिनेते थोडीच आहोत…झाडांच्या अवती भोवती नाचण्यासाठी आम्हाला घेतलं जातं”. पण करिअरच्या सेकंड इनिगंमध्ये केलेल्या भुमिकांमुळे ऋषी कपूर खूप आनंदी होते असंही राज यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 3:13 pm

Web Title: rishi kapoor choked up while talking about cancer diagnosis with friend sgy 87
Next Stories
1 रेड झोनमध्ये असूनही प्राजक्ता माळी लुटतेय ग्रीन झोनचा आनंद
2 फोटोतील तिसरा हात कोणाचा? किम कार्दशियनला नेटकऱ्यांचा प्रश्न
3 एक हात मदतीचा! आशुतोष गोखले गरजूंमध्ये करतोय फूड पॅकेट्सचं वाटप
Just Now!
X