अभिनेत्री जुही चावला आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर तब्बल दोन दशकांनंतर एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. हितेश भाटिया दिग्दर्शित एका फॅमिली कॉमेडी चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे. जुही चावलाने ट्विटरवरून याविषयीची माहिती दिली.

१९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दरार’ या चित्रपटात ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडी दिसली होती. चित्रपटाच्या स्टारकास्टसह जुहीने फोटो शेअर केला. दिल्लीच शूटिंगला सुरुवात होणार असल्याचंही जुहीने ट्विटमधून सांगितलं.

या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलं नसून सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स इन इंडिया आणि मॅकगुफिन पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दिल्ली शहराची या चित्रपटाच्या कथानकाला पार्श्वभूमी असेल.

हिंदी सिनेसृष्टीत ऋषी कपूर आणि जुही चावला या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९२ साली ‘बोल राधा बोल’, १९९४ मध्ये ‘इना मीना डीका’, ‘साजन का घर’ अशा चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र दिसली होती.