16 December 2017

News Flash

VIDEO: ‘सरदारजी’ दिलजितही झाला ‘झिंगाट’

रिअॅलिटी शोच्या व्यासपीठावर केला कल्ला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 20, 2017 3:52 PM

छाया सौजन्य- फेसबुक

पंजाबी सुपरस्टार गायक, अभिनेता दिलजित दोसांज सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावू पाहात आहे. सध्या दिलजित एका रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतही दिसत आहे. कलर्स वाहिनीवरील रायझिंग स्टार या कार्यक्रमाद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमातील त्याच्या सहभागामुळे स्पर्धकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशाच उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या एका भागात दिलजितने चक्क मराठी गाणे गायले.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ हे गाणे गात त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दिलजितने स्वत:च त्याच्या फेसबुक अकाऊंटद्वारे हा झिंगाट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहमीच पंजाबी शैलीत गाणी म्हणणारा दिलजित अस्सल मराठी भाषेतील झिंगाट हे गाणे गाताना पाहून आणि मध्येच सवयीप्रमाणे येणारी त्याची पंजाबी शैली पाहून दिलजितचे हे गाणे चांगलेच गाजतेय. या व्हिडिओसोबत त्याने ‘मी तुझ्यावर प्रेम करतो….’ असं म्हणत पंजाबी शैलीत मराठी गाणे गाण्याचा आनंद व्यक्त केला. त्यामुळे नेहमी पंजाबी गाणी गाऊन प्रेक्षकांची मनं जिंकणारा दिलजित आता त्याच्या या मराठी गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे.

दरम्यान, ‘उडता पंजाब’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत दिलजित दोसांजने फार कमी वेळातच बी टाऊनमध्येही त्याचा चाहता वर्ग निर्माण करण्यात यश मिळवले आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्याने नेहमीच त्याच्या चाहत्यांना फार महत्त्व दिले आहे. सध्या दिलजित त्याच्या आगामी ‘फिल्लौरी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये अनुष्का, दिलजित दोसांज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. २४ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on March 20, 2017 3:52 pm

Web Title: rising star phillauri fame diljit dosanjh sings zingat song from sairat movie