पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून हिरेजडजवाहर व्यापारी नीरव मोदी फरार आहे. बँकेच्या डोळ्यात धुळ फेकण्याचं काम कित्येक वर्षे नीरव मोदी करत होता पण, इतकी वर्षे या कानाची त्या कानाला खबर मात्र लागली नाही. एकंदरच या प्रकरणावर सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकजण आपला राग व्यक्त करत आहेत. कोणी व्यंगचित्राच्या माध्यमातून तर कोणी मीम्सद्वारे उपरोधिक टीका नीरव मोदी आणि सरकारवर करत आहे. अगदी नीरव मोदीला ट्रोल करण्यात झोमॅटोसारखं अॅपपण आघाडीवर होतं. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या ट्रोलिंगमध्ये आता अभिनेता रितेश देशमुखनं देखील उडी घेतली आहे.

‘मी एकमेव बँकचोर आहे जो अयशस्वी झाला’ अशी उपरोधिक टीका रितेशनं केली. विशेष म्हणजे अनेकांना रितेशची ही विनोदबुद्धी भलतीच आवडली अन् रितेशचं हे मास्टर स्ट्रोक ट्विट साडेतीन हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलं. २०१७ मध्ये रितेशचा बँकचोर हा सिनेमा आला होता. हा सिनेमा बाँक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. या सिनेमानं जेमतेम ८ कोटींचा गल्ला जमावला. तेव्हा बँकचोरचं अपयश आणि नीरव मोदीचा घोटाळा याचा ताळमेळ साधत रितेशनं मजेशीर ट्विट केलं. त्यामुळे रितेशचा बँकचोर हा चित्रपट जरी प्रेक्षकांना आवडला नसला तरी त्याची विनोदबुद्धी मात्र लोकांना प्रचंड आवडली.