माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात राहण्याची विनंती केली आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुख याने प्रणव मुखर्जींच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लवकरात लवकर करोनावर मात करावी अन् तंदुरुस्त होऊन घरी परतावं यासाठी रितेशने प्रार्थना केली आहे.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मा यांना करोनाची लागण?; व्हिडीओद्वारे दिली खरी माहिती

अवश्य पाहा – सतीश शाह यांची करोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

“आपण एका दुसऱ्याच कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे”. अशा आशयाचं ट्विट प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे.

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

१९ जुलै ते ४ ऑगस्ट या १७ दिवसांपैकी १५ दिवस करोनारुग्णांची दैनंदिन वाढ ४० हजारांहून अधिक राहिलेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. गोवा सात हजार, त्रिपुरा ५.५ हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड २५००, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.