News Flash

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर ‘माव्‍‌र्हल’च्या प्रेमात

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर पुन्हा एकदा त्याचा तोच प्रसिद्ध आयर्न मॅनचा सूट घालून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर

चाणाक्ष, हुशार, तिरसट आणि तरीही मनाने खूप चांगला असलेला टोनी स्टार्क किंवा ‘माव्‍‌र्हल’ पटातून घराघरात पोहोचलेला आयर्न मॅन या भूमिकेतून आपण हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरला वेगळं काढूच शकत नाही. इतका तो या भूमिकेशी एकरूप झाला आहे. ‘आयर्न मॅन’पटांची मालिका एकीकडे आणि दुसरीक डे ‘माव्‍‌र्हल’च्या प्रत्येक सुपरहिरोला एकत्र आणून तयार झालेली ‘अ‍ॅव्हेंजर्स’पटांची मालिका करतानाच होणारी दमछाक कमी होती की काय म्हणून ‘कॅप्टन अमेरिका’ या मालिकेतही अ‍ॅव्हेंजर्स एकत्र आले आहेत. ‘माव्‍‌र्हल’चं हे एक अनोखं विश्व निर्माण झालं आहे. इथे तुमचा एकदा प्रवेश झाला की तुम्ही इथलेच होऊन राहता, तिथून बाहेर पडत नाही. कारण, माव्‍‌र्हल स्टुडिओची मांडणीच इतकी अप्रतिम असते की ती प्रेक्षकांचाही ठाव घेते आणि कलाकारालाही त्याच्या प्रतिमेत गुंतवून ठेवते, अशा शब्दांत रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने माव्‍‌र्हलवर कौतुकाचा वर्षांव केला आहे.

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर पुन्हा एकदा त्याचा तोच प्रसिद्ध आयर्न मॅनचा सूट घालून प्रेक्षकांसमोर येणार आहे. खरेतर हा चित्रपट ‘कॅप्टन अमेरिका’चा आहे. ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अ‍ॅव्हेंजर्सची टीम एकत्र आली आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये क्रिस इव्हान (कॅप्टन अमेरिकाची भूमिका साकारणारा अभिनेता) आहे. पण तरीही तुम्हाला पोस्टरवर मी दिसतो आहे. त्याच्या बरोबरीने तुम्हाला दिसतो आहे. त्यामुळे मी मी आहेच.. त्याच उत्साहाने मी आयर्न मॅनचा सूट या चित्रपटात चढवला आहे, असे रॉबर्ट म्हणतो.

आयर्न मॅनच्या भूमिके त रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर कमाल करतो हे वास्तव आहे. ज्याप्रमाणे त्याची प्रतिमा लोकांच्या मनात ठसली आहे त्याप्रमाणे अभिनेता क्रिस इव्हान हाही लोकांच्या मनात ‘कॅप्टन अमेरिका’ म्हणून ठसला आहे का?, या प्रश्नावर उत्तर देताना रॉबर्टने क्रिसची खूप प्रशंसा केली. क्रिसशिवाय आणखी कोणी या भूमिकेत फिट बसेल अशी कल्पनाच मी करू शकत नाही. त्याच्या पहिल्या चित्रपटापासून क्रिस हाच ‘कॅप्टन अमेरिका’ आहे हे वास्तव आहे. त्याचं दुसरं कारण म्हणजे माव्‍‌र्हलच्या जगात जेवढे सुपरहिरो आहेत ते त्या भूमिकेसाठी अचूक कलाकार असलेच पाहिजेत, ही खूप मोठी गरज आहे. आणि तुमच्याकडे आत्मविश्वास असल्याशिवाय तुम्ही त्या त्या कलाकारांकडून सुपरहिरोचं काम काढून घेऊ शकत नाही, असं तो म्हणतो.

क्रिस पहिल्या चित्रपटापासून आत्तापर्यंत निश्चितच बदलला आहे. म्हणजे पहिल्या चित्रपटात त्याची ढाल हेच त्याचं एकमेव शस्त्र होतं. आता तसं उरलेलं नाही. त्याची स्वत:ची अशी भूमिका आहे, तत्त्व आहेत आणि ते सगळं क्रिसच्या व्यक्तिमत्त्वातून पुरेपूर उतरताना दिसतं. क्रिससाठी आणखी एक फायदा असा झाला की त्याला या चित्रपटांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनासारख्या वेगळ्या गोष्टींचाही अभ्यास करण्याची संधी मिळाली. क्रिसला दिग्दर्शन आणि अशा अनेक गोष्टींत रस आहे. आणि दुसरं म्हणजे ‘कॅप्टन अमेरिका’च्या त्या हेल्मेटमध्ये फिट बसणारं डोकं शोधून काढणं मुश्कीलच होतं, अशी मिश्कील टिप्पणी करत क्रिसशिवाय ती भूमिका अन्य कोणीही करू शकलं नसतं, याचा पुनरुच्चारही त्याने केला.

‘आयर्न मॅन’पेक्षाही ‘कॅप्टन अमेरिका’च्या टीमशी आपली जास्त जवळीक असल्याचं रॉबर्ट म्हणतो. कारण माझा या चित्रपटांमध्ये चित्रीकरणात जास्त सहभाग नसल्याने निरीक्षणाची संधी जास्त असते. एकूणच सुपरहिरो पटांचा जॉनर काही वेगळाच असल्याचे तो म्हणतो. म्हणजे आता माझ्या मित्राचा ‘जंगल बुक’ प्रेक्षकांसमोर आला आहे. पुन्हा आमचा चित्रपट येईल. मग पुन्हा दुसरा.. माव्‍‌र्हलपटांची मनोरंजनात्मक मांडणी इतकी प्रभावी असते की लोक  आपोआप या चित्रपटांकडे खेचले जातात. मनोरंजनाशिवाय या चित्रपटांमध्ये काही नसतं, पण तरीही मग कॉमिक कथा वाचणाऱ्यांचा एक मोठा वर्ग या चित्रपटांची वाट पाहात बसलेला असतो. त्यामुळे एक कलाकार म्हणून आपणही ‘माव्‍‌र्हल’पटांच्या प्रेमात आहोत आणि पुढच्या चित्रपटाची वाट पाहतोय, असं त्याने सांगितलं.

बच्चेकंपनीमध्ये व्यक्तीरेखा लोकप्रिय

आयर्न मॅन ही व्यक्तिरेखा बच्चेकंपनीमध्ये इतकी लोकप्रिय आहे की ‘अ‍ॅव्हेंजर्स’ असो नाहीतर ‘कॅप्टन अमेरिका’पट असो ठिकठिकाणी रॉबर्टची सूट चढवून हजेरी असते. कित्येकदा एकाच प्रकारची भूमिका करून कलाकारांना कंटाळा येतो. मात्र मला आयर्न मॅनची भूमिका करताना कंटाळा येत नाही, असे त्याने स्पष्ट केले. आणि त्याचे श्रेय त्याने माव्‍‌र्हल स्टुडिओबरोबरच त्यांचे चित्रपट हाताळणाऱ्या दिग्दर्शकांनाही दिले आहे. म्हणजे सुरुवातीला त्या भूमिका करताना आणि सूट चढवताना एक अवघडवलेपण असायचं, हे सगळं खोटं आहे आणि लोकांना त्याचा काय फायदा? म्हणजे एका कॉमिक कथेपुरती त्याची मर्यादा आहे, असं वाटायचं. पण या चित्रपट मालिकांना जसजसं यश मिळत गेलं तसं ते सुपरहिरोच्या पलीकडे काहीतरी आहे जे लोकांना आवडतं हे लक्षात यायला लागलं. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेकदा लहान मुले स्टेजवर येतात. त्यांच्या डोळ्यात त्यांच्या सुपरहिरोसाठी असलेलं कौतुक सहज जाणवतं. त्यामुळे आता खोटेपणाची भीती राहिलेली नाही, असं तो सांगतो. म्हणजे सूट उतरवल्यावर आपण वास्तव दुनियेत आलो आहोत, ही भावना जास्त थकवणारी असते. त्यामुळे चित्रीकरणासाठी सूट चढवायला मिळाला की खरा आनंद मिळतो, असं रॉबर्ट याने सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 3:46 am

Web Title: robert downey jr
Next Stories
1 खुसखुशीत रहस्यमय ‘भो भो’
2 पृथ्वी’त मराठी नाटके!
3 मनोज वाजपेयीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
Just Now!
X