अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनने केलेल्या लैंगिक अत्याचारांविरोधात आजवर अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या तब्बल ४०पेक्षा जास्त प्रतिष्ठित अभिनेत्रींनी आवाज उठवला. परंतु रोझ मॅक्गोवनव्यतिरिक्त इतर दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रींनी अद्याप न्यायालयात जाऊन त्याविरोधात लढा देण्याचा प्रयत्न केलेला नाही. परिणामी, रोझ मॅक्गोवन या कायदेशीर लढय़ात सध्या एकटी पडल्याचे चित्र दिसते आहे. रोझने हार्वेला थेट न्यायालयात आव्हान दिले. त्याने केलेल्या अत्याचाराबद्दल त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. परंतु ही प्रतिज्ञा आर्थिक चणचणीमुळे तिच्या अंगलट आली आहे.

न्यायालयात लढण्यासाठी वकिलांवर भरपूर पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. आणि हार्वेसारख्या शक्तिशाली विरोधकाबरोबर लढायचे असेल तर मात्र आर्थिक बाजू आधिकच प्रबळ असणे गरजेचे ठरते. रोझची आर्थिक बाजू आता हळूहळू कमकुवत होत चालली आहे. यावर पर्याय म्हणून तिने आपले कोटय़ावधींचे घर देखील विकले. परंतु न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची गती पाहता ते पैसेदेखील लवकरच संपतील आणि मग तिला आर्थिक मदतीची गरज भासेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रोझच्या मते जेव्हा तिने हार्वेला न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा तिचे मनोबल वाढवणारे अनेक सहकारी तिच्या बरोबर होते. अनेक सामाजिक संस्था, कलाकार, महिला खेळाडूंनी तिची तोंडभरून स्तुती केली. परंतु आता तिला लोकांच्या शाब्दिक मनोधैर्याची नव्हे तर आर्थिक मदतीची गरज आहे, पण अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांपैकी कोणीही तिच्या मदतीला येत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. तरीही रोझ आपल्या निश्चयावर ठाम असून, वेळप्रसंगी हार्वेविरोधात लढण्यासाठी आपली संपूर्ण मालमत्ता विकण्यासही आपण तयार असल्याचा दावा तिने केला आहे.