खऱ्या आयुष्यातील प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर आणल्या जात आहेत आणि प्रेक्षकांचा अशा चित्रपटांना चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. मग ते ‘भाग मिल्खा भाग’ असो किंवा ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’. बायोपिकचा ट्रेण्डच बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत आहे. अशीच आणखी एका प्रेरणादायी कथा दिग्दर्शक अनुराग कश्यप घेऊन येत आहे. जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ‘सांड की आँख’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर शूटर दादींची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘तन बुढ्ढा होता है, मन बुढ्ढा नहीं होता,’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या ८६ वर्षीय चंद्रो तोमर आणि ८१ वर्षांची त्यांची नणंद प्रकाशी यांचा जीवनपट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. वयाच्या ५० वर्षांनंतरही आयुष्याची एक नवी सुरुवात करता येऊ शकते हे चंद्रो आणि प्रकाशी यांच्याकडे पाहून समजते. ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून यांना ओळखलं जातं. जोहरी रायफल क्लबमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध स्पर्धांमध्ये या दोघींनी मिळून ७००हून अधिक पदकं जिंकली आहेत. चंद्रो आणि प्रकाशी यांची मुलं आणि नातवंडंसुद्धा शूटर्स आहेत. तोमर कुटुंबातील महिला जोहरी रायफल असोसिएशनमध्ये प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

‘सांड की आँख’ या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि निधी परमारने केली आहे. तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. याआधी त्यांनी ‘मै तेरा हिरो’, ‘एक विलन’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटांची पटकथा लिहिली होती. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.