जगातील सर्वात वृद्ध शार्पशूटर चंद्रो तोमर आणि त्यांची नणंद प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारित ‘सांड की आँख’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रिव्हॉल्वर दादीं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची भूमिका साकारण्याची सूवर्ण संधी तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर यांना मिळाली आहे.

भूमि आणि तापसीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून या चित्रपटासंदर्भात माहिती दिली. भूमि आणि तापसी या दोघीही या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे पण त्याआधी तापसी आणि भूमिसह चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘रिव्हॉल्वर दादीं’चे आशीर्वादही घेतले.

कोण आहेत या ‘रिव्हॉल्वर दादी’
उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या चंद्रो तोमर या ८७ वर्षांच्या आहेत. तर त्यांची नणंद प्रकाशी तोमर या ८२ वर्षांच्या आहेत. वयाच्या ६५ व्या वर्षापासून त्यांनी बंदूक चालवण्यास सुरूवात केली. काही वर्षांपूर्वी चंद्रो यांची नात शेफाली नेमबाजीचे धडे घेत होती. पण हातात बंदूक येताच तिला घाम फुटला. तिला काही केल्या बंदूक लोड करता येईना. नातीची भीती पाहून आजींनी स्वत: बंदूक लोड केली आणि निशाणा साधला. विशेष म्हणजे यापूर्वी कधीही चंद्रो यांनी हातात बंदूक घेतली नव्हती. त्यांची नेमबाजी पाहून शेफालीचे कोच आश्चर्यचकित झाले. या आजींमध्ये काहीतरी वेगळं आहे हे त्यांनी चटकन हेरलं. या घटनेनंतर चंद्रोनां नेमबाजीचं अधिकृत शिक्षण देण्यात आलं.

तर प्रकाशी तोमर यांनी देखील चंद्रोचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत नेमबाजीच्या प्रशिक्षणास सुरूवात केली.या दोघीही नेमबाजीत पारंगत झाल्या. चंद्रो आणि प्रकाशी अनेक नवख्या मुलींना नेमबाजीचे धडे देतात. चंद्रो यांनी वेगवेगळ्या स्पर्धांत १०० हून अधिक पदकं जिंकली आहेत.