अनुराग कश्यप आणि निधी परमार यांचा ‘सांड की आँख’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ह्या चित्रपटाची सुरूवातीपासूनच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. जगातील सर्वात वृद्ध शार्पशूटर चंद्रो तोमर आणि त्यांची नणंद प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट चित्रपट आधारित आहे. ‘रिव्हॉल्वर दादीं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या भूमिकांमध्ये तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर या अभिनेत्री दिसणार आहेत.
ट्रेलरची सुरूवात प्रकाश झा यांच्यापासून होते. त्यात ते म्हणतात की, ‘बंदूक मजाक ना है, ये मर्दो का गेहना है’. त्या नंतर दोघीही अगदी सहजतेने लक्ष्यावर निशाना साधताना दिसत आहेत. तापसी आणि भूमी पेडणेकर यांच्यात असणारी केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या ८६ वर्षीय चंद्रो तोमर आणि ८१ वर्षांची त्यांची नणंद प्रकाशी यांचा जीवनपट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून यांना ओळखलं जातं. जोहरी रायफल क्लबमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध स्पर्धांमध्ये या दोघींनी मिळून ७००हून अधिक पदकं जिंकली आहेत. चंद्रो आणि प्रकाशी यांची मुलं आणि नातवंडंसुद्धा शूटर्स आहेत. तोमर कुटुंबातील महिला जोहरी रायफल असोसिएशनमध्ये प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

‘सांड की आँख’ या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि निधी परमारने केली आहे. तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. याआधी त्यांनी ‘मै तेरा हिरो’, ‘एक विलन’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटांची पटकथा लिहिली होती. येत्या दिवाळीत म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.