वेब मालिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यात भर पडते आहे चांगल्या कलाकारांची. दूरदर्शन ते मराठी-हिंदी चित्रपट, वाहिन्यांवरच्या मालिका, नाटक असा मोठा पल्ला गाठलेले अनेक प्रतिभावंत कलाकार सध्या वेब सीरिजच्या नव्या माध्यमाकडे वळले आहेत. या वेब सीरिजमध्ये आता आणखी एक भर पडली आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि एक्सेल मीडिया अॅण्ड एंटरटेन्मेंट यांनी प्राइम ओरिजिनल वेब सीरिज ‘मिर्झापूर’ प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरिजमध्ये सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

या वेब सीरिजची कथा अमली पदार्थ, शस्त्र आणि सत्तेचे राजकारण यांभोवती फिरणारी आहे. करण अंशुमन आणि पुनीत कृष्णा यांची निर्मिती असलेली व गुरमित सिंग यांनी दिग्दर्शित केलेली ‘मिर्झापूर’ ही सीरिज नऊ भागांची आहे. १६ नोव्हेंबरपासून प्राइम व्हिडिओवर ही सीरिज स्ट्रीम केली जाणार आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मेसी, दिव्येंदू शर्मा, कुलभूषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, रसिका दुगल यांच्यासह अनेक कलावंतांचा समावेश आहे.

वाचा : अभिषेकच्या सर्वांत आवडत्या रोमॅण्टिक चित्रपटात सलमान- ऐश्वर्याची जोडी

मिर्झापूर ही भारतातून आलेली पाचवी प्राइम ओरिजिनल सीरिज असून रितेश सिधवानी, करण अंशुमन आणि फरहान अख्तर या यशस्वी त्रयीला या मालिकेने पुन्हा एकत्र आणले आहे. सर्वोत्तम ड्रामा सीरिज या विभागात अलीकडेच नामांकन प्राप्त झालेल्या ‘इनसाइड एज’ या मालिकेची निर्मिती या तिघांनीच केली होती.

सत्तेच्या मोहाने झपाटलेल्या आणि शेवटी त्यातच संपून जाणाऱ्या दोन भावांचा प्रवास ‘मिर्झापूर’मध्ये दाखवण्यात येणार आहे.