वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘सेक्रेड गेम्स २’ ही बहुचर्चित वेब सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजच्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची फार उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे दुसऱ्या सिझनची कथा जाणून घेण्यासाठी अनेकजण आतूर होते. या नवीन सिझनमध्ये काही नवीन कलाकारांचीही भर पडली आहे. यात कल्की कोचलीन, रणवीर शौरी व पंकज त्रिपाठी यांचा समावेश आहे. पंकज त्रिपाठीने यात गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दीकी) तिसऱ्या गुरूजींची भूमिका साकारली आहे.

पंकजने साकारलेल्या गुरूजींच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या अभिनयासोबतच आणखी गोष्ट लोकांच्या विशेष लक्षात राहिली ती म्हणजे गुरूजींचं आश्रम. ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये दाखवण्यात आलेला गुरूजींचा भव्यदिव्य आश्रम भारतातच आहे. विशेष म्हणजे यात दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलचं रुपांतर आश्रमात करण्यात आलं आहे.

आणखी वाचा : तापसीच्या ‘त्या’ फोटोवरून अनुरागने उडवली खिल्ली

दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असलेल्या रोसेट हाऊस या पंचतारांकित हॉटेलमध्ये आश्रमचा सेट उभारण्यात आला होता. गजबजलेल्या दिल्लीतील या हॉटेलमध्ये अत्यंत शांततापूर्ण वातावरण आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा शांत वेळ जर तुम्हाला घायवायचा असेल तर तुम्ही या हॉटेलला कधीही भेट देऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल.

‘सेक्रेड गेम्स२’ला प्रेक्षकांंकडून संमीश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींना हा सिझन आवडला तर काहींना त्याची कथा पटली नाही. अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी मिळून दुसऱ्या सिझनचे दिग्दर्शन केले आहे. १५ ऑगस्ट रोजी ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.