बहुचर्चित ‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. पहिला सिझन हिट ठरल्यानंतर दुसऱ्या सिझनची प्रेक्षकांना फार उत्सुकता होती. कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या सिझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

१. मुंबईवर कोणतं संकट आहे?

वेब सीरिजचा पहिला सिझन जर तुमच्या लक्षात असेल तर गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) सरताज सिंगला (सैफ अली खान) फोन करते आणि तुझ्याकडे २५ दिवस आहेत…वाचवून घे शहराला अशी धमकी देतो. मात्र पूर्ण सीरिजमध्ये मुंबईवर नेमकं कोणतं संकट आहे याचा संभ्रम कायम राहतो. त्यामुळे आता दुसऱ्या सिझनमध्ये तरी हे स्पष्ट होईल असं दिसतंय.

२. सर्वांची हत्या झाली तर त्रिवेदी कसा वाचणार?

गणेश गायतोंडे म्हणजेच नवाजुद्दीन सिद्दीकी सरताज सिंगला फोन करून सांगतो की सर्वजण मरणार.. फक्त त्रिवेदी वाचणार. जर सर्वांवर हे संकट आहे तर फक्त त्रिवेदी कसा वाचणार, हा प्रश्न पहिल्या सिझनमध्ये अनुत्तरितच आहे. त्यामुळे दुसऱ्या सिझनमध्ये हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

३. गणेश गायतोंडे आणि सरताजचं नेमकं काय कनेक्शन आहे?

गणेश गायतोंडे जेव्हा सरताजला फोन करतो तेव्हा सांगतो की तो दिलबाग सिंगचा मित्र आहे. दिलबाग सिंग हे सरताजच्या वडिलांचं नाव आहे. माझ्या वडिलांना कसा ओळखतोस असा प्रश्न जेव्हा सरताज गायतोंडेला विचारतो तेव्हा त्याच्याकडे नेमकं उत्तरच नसतं. ‘यही तो खूबसूरती है इस शहर की साहेब… यहां कुछ भी हो सकता है,’ असं म्हणून तो उत्तर देणं टाळतो. त्यामुळे आता या नव्या सिझनमध्ये या दोघांमध्ये नेमकं काय कनेक्शन आहे हे समजू शकेल.

४. संपूर्ण खेळाचा मास्टरमाइंड कोण आहे?

पहिल्या सिझनच्या अखेरपर्यंत असं वाटतं की गणेश गायतोंडे हा सर्व खेळ रचत आहे. मात्र वास्तवात असं घडत नाही. गणेश गायतोंडे शिवाय आणखी एक मोठा माणूस हे सर्व षडयंत्र रचतोय याची कल्पना येते. गुरुजींविषयी बऱ्याच गोष्टी पहिल्या सिझनमध्ये उघड झाल्या नव्हत्या. मात्र या दुसऱ्या सिझनमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची दिसतेय.

५. गुरुजींची नेमकी काय भूमिका आहे?

गणेश गायतोंडेच्या सर्व खेळात गुरुजींची नेमकी भूमिका काय आहे हे या सिझनमध्ये स्पष्ट होणार असल्याचं दिसतंय. कारण ट्रेलरमध्ये त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या सिझनमध्ये पंकज त्रिपाठीची भूमिका प्रेक्षकांवर छाप सोडू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.