‘यदा कदाचित’, ‘यदा कदाचित-२’ या व्यावसायिक नाटकांमधून तर दूरचित्रवाहिन्यांवरील ‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ  द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून रसिकांना हसवणारी भाऊ  कदम आणि सागर कारंडे ही जोडी पुन्हा एकदा रंगभूमीवर आली आहे. राजेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर निर्मित ‘करून गेलो गाव’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आले आहे. ‘करून गेलो गाव’ या विनोदी नाटकाचे भाऊ  कदम, वैभव मांगले या जोडीने पाचशे प्रयोग केले होते. पाचशे प्रयोगांनंतर हे नाटक काही कारणास्तव थांबले होते आता ते नव्या रंगात व नव्या ढंगात रंगभूमीवर सादर झाले आहे. ‘जस्ट हलकं फुलकं’, ‘सैरावैरा’ या नाटकांनंतर बऱ्याच वर्षांनी सागर पुन्हा एकदा रंगभूमीवर परतला आहे. रंगभूमी-दूरचित्रवाहिनी-रंगभूमी असे त्याच्या कामाचे फिरते चR  आहे. ‘चला हवा येऊ  द्या’च्या दौऱ्यामुळे त्याला अनेक वर्षे इच्छा असूनही व्यस्त वेळापत्रकामुळे रंगभूमीवर नाटक करता आले नव्हते. जुने किंवा नवीन कोणतेही नाटक स्वीकारण्याची त्याची  तयारी होती. एक दिवस लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि निर्माते महेश मांजरेकर यांचा दूरध्वनी सागरला आला आणि त्यांनी या नाटकाची विचारणा केली. सुदैवाने ‘चला हवा येऊ  द्या’चा विश्वदौरा संपला होता. त्यामुळे त्याने या नाटकात काम करायला होकार दिला.  नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी (१४ एप्रिल) गडकरी रंगायतनला पार पडला. हाही एक योगायोगच म्हणावा लागेल. कारण सात वर्षांपूर्वी जेव्हा हे नाटक रंगभूमीवर आले होते तेव्हाही या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १४ एप्रिललाच झाला होता. जुने ‘करून गेलो गाव’ आणि आत्ताचे ‘करून गेलो गाव’ यात अनेक बदल करण्यात आले आहेत. जुन्या ‘करून गेलो’ मधील वैभव मांगले यांच्या तोंडी देण्यात आलेले राजकीय विनोद काढून टाकण्यात आले असून नवीन विनोद सागरच्या तोंडी देण्यात आले आहेत. नाटकातील अनेक छोटय़ा-मोठय़ा जागा नवीन विनोदाने भरण्यात आल्या आहेत. ‘करून गेलो गाव’ हे कोकणी विनोदी नाटक आहे. यात सागरच्या तोंडी संगमेश्वरी कोकणी बोलीभाषा आहे. सागरचे हे पहिलेच कोकणी नाटक असल्यामुळे त्याने तालमीत या भाषेवर मेहनत घेतली. लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्याशी तो त्याच भाषेत बोलत असे. ज्यामुळे तो शाब्दिक उच्चार, अचूक हेल व लहेजा आत्मसात करू शकला.

रंगभूमी ही माझ्यासाठी सलाइनची बाटली आहे. प्रचंड ऊर्जेचा स्रोत इथे आहे. ज्याप्रमाणे लहान मूल गाव हिंडून आल्यावर आईच्या कुशीत शांतपणे निजते अगदी त्याचप्रमाणे मी कितीही जगभर फिरलो तरी रंगभूमीकडे परत आलो आहे.   – सागर कारंडे