मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि तितकंच नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर. सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणारी सई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिनयाच्या बाबतीत सजग असणारी सई सामाजिक क्षेत्रातही तितकीच सजग असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा सई विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपलं सामाजिक भान जपत असते. यावेळीदेखील सईने असंच काहीसं केलं आहे. आज सईचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त तिने एका खास उपक्रमाच्या माध्यमातून १०० लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे.

गेल्यावर्षी सईने तिच्या वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला होता. सईने तिच्या फॅनक्लब सईहोलिक्सने एका गावात जाऊन वृक्षारोपण केलं होतं. त्यानंतर यंदाचा वाढदिवसही तिने असाच समाजिक भान जपत साजरा केला.  दरवर्षी वाढदिवसानिमित्त सईहोलिक्स काही ना काही सामाजिक उपक्रम हाती घेतात. यंदा त्यांनी पुण्यातल्या सुमारे १०० गरजू मुलांना वह्या-पुस्तके, पेन्सिल अशा शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप केले. सईच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात फिरत असलेल्या ‘सई बर्थडे ट्रक’ने गरीब मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला.

“माझ्या टीमला सई बर्थडे ट्रकची कल्पना सुचली. हे माझे भाग्य आहे की, मला असा फॅनक्लब आणि अशी टीम मिळाली आहे. माझ्या विचारांचा आदर करून ते विचार अंगिकारणारा हा फॅनक्लब असणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि मीही माझ्या चाहत्यांना आपल्या कामातून प्रेरणा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहीन,” असं सई म्हणाली.

“सई आपला वाढदिवस दिमाखात साजरा करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात सामाजिक कार्य करण्यावर भर देते आणि सईचा हा विचार पुढे नेतच आम्ही फॅनक्लबनेही मग तिचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायचं ठरवलंय. म्हणूनच यंदा गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी आम्ही खाऊ आणि त्यांना आवश्यक असलेल्या भेटवस्तूंचे वाटप केले,” असं सईहोलिक्सने सांगितलं.