अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर प्रामुख्याने जोरदार टीका झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता सैफ अली खानने “मीसुद्धा घराणेशाहीचा शिकार झालो”, असं म्हणत सर्वांच लक्ष वेधलं आहे. या मुलाखतीत सैफने सुशांतबद्दलही वक्तव्य केलं.

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना तो म्हणाला, “कॉफी विथ करण या शोमध्ये कंगना काय बोलत होती ते मला माहित नाही. करण जोहरबद्दल म्हणायचं झाल्यास, त्याने स्वत:ला इतकं मोठं बनवलं आहे की आता त्यामुळे त्याला टीकेला सामोरं जावं लागत आहे. सत्य हे नेहमी गुंतागुंतीचं असतं. त्यात इतरही बऱ्याच गोष्टी असतात. पण लोकांना त्यात रस नसतो. मला आशा आहे की ही लाट लवकरच संपेल आणि चांगल्या गोष्टी पुन्हा ऐकायला मिळतील. भारतात असमानता आहे आणि त्याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. घराणेशाही, पक्षपातीपणा, गटबाजी हे सर्व खूप वेगळे विषय आहेत. मीसुद्धा घराणेशाहीचा शिकार झालो पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. चित्रपट संस्थांमधून अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचं पाहून मला आनंद होतो.”

या मुलाखतीत सुशांत सिंह राजपूतबद्दल सैफ म्हणाला, “तो खूप प्रतिभावान आणि चांगला दिसणारा होता. त्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे असं मला वाटलं होतं. तो माझ्याशी नम्रपणे वागला होता आणि माझ्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेचंही त्याने कौतुक केलं होतं. खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान याविषयी त्याला फार काही बोलायचं होतं. तो माझ्यापेक्षाही हुशार असल्याचं मला वाटलं होतं.”

सुशांतने १४ जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला.