बांधकाम व्यवसायिक समीर भोजवानी याच्या सुटकेवर चिंता व्यक्त करत अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. सायरा बानो यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींना आपण तुमच्या भेटीची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. समीर भोजवानी दिलीप कुमार यांचा बंगला बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. दोन प्लॉटवर समीर भोजवानी चुकीच्या पद्धतीने दावा करत आहे. याच जमिनीवर दिलीप कुमार यांचा बंगला आहे. दरम्यान सायरा बानो यांनी आपली अद्याप मोदींशी भेट झाली नसून गरज पडल्यास त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाऊ असं म्हटलं आहे.

याआधीही अनेकदा सायरा बानो यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणाच लक्ष घालण्याची विनंती केली आहे. सोमवारी सायरा बानो यांनी पुन्हा नव्याने ट्विट करत नरेंद्र मोदींना आपण तुमच्या भेटीची वाट पाहत असल्याचं सांगितलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या सततच्या आश्वासनाला कंटाळलो असल्याचंही लिहिलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘माननीय नरेंद्र मोदी तुमच्या भेटीची वाट पाहत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांना आता मी कंटाळली आहे. लँड माफिया समीर भोजवानीपासून आमचं घर वाचवण्यासाठी आता तुम्हीच शेवटची आशा आहात’.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असल्याने सायरा बानो यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. ‘व्यस्त असल्याने मी पंतप्रधानांना भेटू शकले नाही. पण त्यांचा कार्यालयाने याप्रकरणी चौकशी करण्याचा आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. मी त्याचं ट्विटही केलं आहे’, अशी माहिती सायरा बानो यांनी दिली.

‘गरज पडल्यास मी मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला जाईन. मी कशा पद्धतीने हे सगळं करेन मला माहिती नाही, पण मी करणार’, असं सायरा बानो यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण?
डिसेंबर २०१७ मध्ये सायरा बानो यांनी आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर समीर भोजवानी यांच्याविरोधात तक्रार केली होती. वांद्र्यांच्या पाली हिल भागातील दिलीप कुमार यांचा बंगला बळकावण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले तसेच यासंबधी सायरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिलं होतं. समीर भोजवानी याने काही खोटी कागदपत्रं तयार केली आहेत. या कागदपत्रांच्या आधारेच तो दिलीप कुमार यांना धमकावत आहे. शिवाय समीरची राजकीय वर्तुळातही फार ओळख असल्याने तो आम्हाला सतत धमकावत असल्याचे सायरा यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानंतर समीर भोजवानीला अटकही झाली होती. त्याची सुटका झाल्यानंतर सायरा बानो यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी धाव घेतली.