देशभर गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटामुळे अफाट लोकप्रियता लाभलेल्या अकलूजच्या ‘आर्ची’ने अर्थात रिंकू राजगुरू हिने शाळा सोडली आहे. परंतु तिला येत्या फेब्रुवारी-२०१७ मध्ये होणारी दहावीची परीक्षा द्यायची असून त्यासाठी तिने १७ क्रमांकाचा अर्ज पुण्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त मंडळाकडे भरला आहे.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जिजामाता कन्या प्रशालेत शालेय शिक्षण घेत असतानाच आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिला नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत तिने अफाट लोकप्रियता मिळविली. या चित्रपटाने घातलेले गारुड अद्यापि कायम आहे. केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात तिला वलय प्राप्त झाले आहे. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारी रिंकू ही कामात इतकी व्यस्त आहे, की तिला दररोज शाळेत येऊन दहावीचे शिक्षण घ्यायला वेळच राहिला नाही. शिवाय ती जेथे जाते, तेथे हजारो चाहत्यांची गर्दी उसळते. तिच्या सार्वजनिक जीवनात खूप मर्यादा आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर अकलूजमध्ये राहून दहावीचे शिक्षण घेणे अशक्य असल्यामुळे आर्ची हिने शाळा सोडली. तसा दाखला तिने गेल्या जूनमध्येच काढल्याचे शाळेतील सूत्रांनी सांगितले. या संदर्भात प्राथमिक शिक्षक असलेले रिंकूचे वडील महादेव राजगुरू यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी आपली कन्या रिंकू हिने जिजामाता कन्या प्रशालेतून शाळा सोडल्याचा दाखला काढल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. परंतु शाळा सोडल्याचा दाखला घेणे म्हणजे शिक्षण अर्धवट सोडणे नव्हे, असे स्पष्ट करीत महादेव राजगुरू यांनी या संदर्भात पालक म्हणून आपण खूप जागरूक असल्याचे नमूद केले. रिंकू  शिक्षणातसुद्धा गुणवंत आहे. केवळ चित्रपट जगतामुळे मिळालेल्या वलयामुळे तिने प्रत्यक्ष शाळेत न जाता दहावीची परीक्षा बाहेरून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अर्ज तिने भरला आहे. दहावीनंतर तिला पुढचे शिक्षणही घ्यायचे आहे. विशेषत: इंग्रजी भाषेत पारंगत व्हायचे आहे.