“अयं व्हय बाहेर, मराठीत सांगितल्यालं कळतं नायं, इंग्लिशमध्ये सांगू!” या वाक्यानं याडं लावणारी आर्ची थेट कर्नाटकात पोहोचली आहे. आता ती कन्नड बोलताना दिसते आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास तसा भन्नाटच होता. ना ती कोणत्या अभिनयाच्या कोर्सला गेली, ना कॅमेऱ्याची तिला हौस होती. पण नागराजने गावरानं छोरीतं अस्स बळ भरलं की, ती क्षणार्धात परी झाली. रांगड्या आवाजात मराठी-इंग्लिश बोलणं असो वा कन्नड-इंग्लिश भाषेत तिच्यात दिसणारा बाज असो या सगळ्याचं श्रेय नागराजच. जन्म देणाऱ्या आई-वडिलांनंतर या पोरीच्या आयुष्याचा तिसरा कोणी शिल्पकार असेल, तर तो म्हणजे तिचा नागराज दादा. यशाची चव चाखताना वेळोवळी आर्ची अर्थात रिंकू राजगूरुनं हे कबुल देखील केलं आहे.

रिंकूच्या आयुष्याला कलाटणी
तशी आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलींची नावे बदलण्याची परंपरा आहे. पण नागराजने रिंकू राजगुरु हे नावचं नव्हे, तर पोरीचं आयुष्यच बदललं. अल्पवयीन वयात चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आर्चीचे याडं लोकांना लागण्याचं कारण कदाचित हेच असावे. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिने अल्पवयीन वयात कमालीचे पदार्पण केले. असे पदार्पण कदाचित पुन्हा होणे नाही, असेच म्हणावे लागेल.

वाचा : #SairatMania : गोष्ट नागराज नावाच्या ब्रॅण्डची!

आर्ची अर्थात रिंकूची निवड
‘सैराट’ चित्रपटातील आर्चीचा प्रवास हा खरंच कौतुकास्पद आहे. नागराजने ही मूर्ती घडविण्यासाठी सुरुवात केली ती चित्रपटाच्या कामास सुरुवात करण्याच्या तीन वर्षे आधी. त्यावेळी नागराजच्या ‘फँड्री’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. आगामी चित्रपटासाठी चेहऱ्याचा शोध घेत असलेल्या नागराजला नोव्हेंबर २०१३ मध्ये त्याच्या एका मैत्रिणीच्या मुलीत आर्चीची झलक दिसली. नागराजच्या नजरेनं जेव्हा तिला हेरले तेव्हा रिंकू सातव्या इयत्तेत होती. ‘सैराट’साठी तिची ऑडिशन घेण्यास सांगितल्यानंतर त्याच्या टीमलाही तो धक्काच होता. मात्र चित्रपट प्रदर्शनानंतर या पोरीनं सर्वांना अवाक् केलं.

वाचा : #SairatMania : ‘त्या’ झिंगाट आठवणींना नव्यानं उजाळा…

.. म्हणून ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
रिंकू राजगूरुच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला चित्रपटसृष्टीचा गंध नाही. खुद्द तिने स्वत: याबाबत कधी विचार केला नव्हता. दिग्दर्शक या व्यक्तीबद्दल तिला फक्त पुसटशी कल्पना होती. हे सर्व असताना तिने नागराजच्या चित्रपटात काम केले. तो सांगत गेला अन् ती करत गेली. अल्पवयीन वयात आपल्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी व्यक्तिरेखा साकारणे फारच कठीण काम तिने शिताफीने पेललं. चित्रपटात बिनधास्त प्रेयसी, पत्नी आणि आई अशा तिहेरी भूमिकेतील तिच्या प्रवासाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले ते यामुळेच.

चित्रपटात आर्चीची कोंडी
अल्लड वयात प्रेयसीची भूमिका साकारण्यापर्यंत ठीक होते. पण, या चित्रपटातील झिंगाट गाण्यानंतरचा क्षण साकारणे तिच्यासाठी फार मोठे आव्हान होते. एखाद्या अभिनेत्रीला अशा प्रकारचा रोमान्सचा सीन साकारणे जड गेले नसते. पण अवघ्या १५ वर्षाच्या मुलीला अभिनयाच्या सुरुवातीलाच हे सारं करणं अवघड होतं. चित्रपटातील या दृश्यावेळी अवघडल्यासारखे वाटल्याचे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

….अन् मग कन्नडमध्ये ती संजू झाली
पदार्पणातील पहिल्या चित्रपटाला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच तिचा दुसरा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे तिचा हा चित्रपट मराठी भाषेत नसून कन्नडमध्ये आहे. या निमित्ताने तिने राज्याची सीमा ओलांडली आहे. ‘मनसु मल्लिगे’ या कन्नड चित्रपटात ती परशा नव्हे तर अभिनयाचा वारसा घेऊन जन्मलेल्या निशांतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतेय. या चित्रपटात रिंकूने संजू नावाची भूमिका साकारली आहे.