बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटी किड्सचीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. सैफची मुलगी सारा अली खान असो किंवा श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, या सेलिब्रिटी किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे आणखी एक सेलिब्रिटी किड चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्माता- दिग्दर्शक साजिद नाडियादवाला हितिका गलानीला लाँच करणार आहे. हितिका ही निर्माता विजय गलानी यांची मुलगी आहे.

साजिद नाडियादवाला यांनी आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींना लाँच केले आहे. जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सनॉन यांसारखे नवे चेहरे त्याने बॉलिवूडला दिले आहेत. सुनील शेट्टीचा मुलगा आहान याला लाँच करण्याची घोषणा साजिदने आधीच केली आहे. आता हितिकाला साजिद कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

वाचा : अमिषा पटेल ट्रोल; युजरने दिला पॉर्नस्टार होण्याचा सल्ला

गेल्या दीड वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी हितिका मेहनत घेत आहे. यासंदर्भात ती म्हणाली की, ‘साजिद भाईंनी नेहमीच मला मुलीसारखे वागवले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी मला पाहिलं आणि तू अभिनेत्री होऊ शकतेस, असं ते म्हणाले. सुरुवातीला ते थट्टा करत आहेत की काय, असंच मला वाटलं. पण त्यांनी मला हे करिअर गंभीरपणे घेण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून मी तयारी करत आहे.’