‘फोर्ब्स’नं नुकतीच world’s 100 highest paid entertainers जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रीटींची यादी जाहीर केली. जगभरातील मनोरंजन, संगीत, खेळ यांसारख्या विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या १०० सेलिब्रिटीची नावं या यादीत आहेत. या यादीत भारतातील दोन अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शाहरुख आणि आमिरला मागे टाकत अक्षय कुमारनं या यादीत स्थान पटकावलं आहे. जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलीब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार ७६ व्या स्थानी आहे.

अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांमध्ये अक्षयनं काम केलं. चित्रपटाच्या माध्यामातून त्यानं हे प्रश्न पुढे नेले आहेत असं कौतुक फोर्ब्सनं केलं आहे. अक्षयचं एकूण उत्पन्न ४०.५ मिलिअन डॉलर म्हणजे एकूण अडीच अब्जाहून अधिक असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे. अक्षयनंतर या यादीत ८२ व्या क्रमांकावर बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानच्या नावाचा समावेश आहे. सलमानची एकूण कमाई ही ३७.७ मिलिअन डॉलर म्हणजे २ अब्जाहून अधिक असल्याचं म्हटलं जातं आहे. सलमानचे चित्रपट हे गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधले सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट म्हणून ओळखले जातात. सलमान म्हणजे चित्रपट २०० कोटीहून अधिकचा गल्ला जमवणार हे समीकरण ठरलेलंच आहे त्यामुळे या यादीत स्थान मिळवण्यात सलमानही यशस्वी झाला आहे. या यादीत फ्लाईड मेवेदर अव्वल स्थानी आहे. मेवेदर प्रसिद्ध बॉक्सर आहे.