बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या कुटुंबाने लंका प्रिमिअर लीगमध्ये (LPL) एक टीम विकत घेतली आहे. याआधीही खान कुटुंब खेळाशी जोडला गेला होता. विशेष म्हणजे सलमानचा भाऊ सोहेल खानला खेळात फार रस असल्याने त्याने एलपीएलमध्ये गुंतवणूक केली आहे.

सोहेल खान आणि सलमानचे वडील सलीम खान यांनी लंका प्रीमिअर लीगमधील कँडी टस्कर्स टीमची फ्रँचाइजी विकत घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच या टी-२० लीगचं ड्राफ्ट तयार करण्यात आलं होतं. यामध्ये काही भारतीय खेळाडूसुद्धा खेळणार असल्याचं कळतंय.

LPL T20 लीगचा पहिला हंगाम २१ नोव्हेंबरपासून श्रीलंकेत सुरू होणार आहे. तर १३ डिसेंबर रोजी त्याचा अंतिम सामना असेल. टूर्नामेंटमध्ये अंतिम सामन्यासहित एकूण २३ सामने खेळले जातील. लंका प्रीमिअर लीगमध्ये पाच संघांनी भाग घेतला आहे. कोलंबो किंग्स, कँडी टस्कर्स, गाले, दांबुल आणि जाफना या संघांचा त्यात समावेश आहे. यामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंसोबतच ७५ परदेशी खेळाडूसुद्धा सहभागी होणार आहेत.