निर्माता दिग्दर्शक करण जोहरचा आगामी सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’चा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या टिझरची प्रशंसा अनेकांनी केली. बऱ्याच काळानंतर ऐश्वर्या एका वेगळ्या व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहे. रणबीर कपूरबरोबरच्या तिच्या जोडीची चर्चाही सिनेवर्तुळात होत आहे. आता सलमान खाननेही या ट्रेलवर आपले मत व्यक्त केले आहे.
सलमान खानला एका कार्यक्रमाच्यावेळी त्याने ‘ए दिल है मुश्किल’चा ट्रेलर पाहिला का असा प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना सलमान म्हणाला की, त्याने आतापर्यंत तरी याचा ट्रेलर पाहिलेला नाही. पण, ज्याअर्थी तुम्ही हा प्रश्न विचारताय तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. तर तुम्हीच सांगा कसा आहे ट्रेलर?
सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्याबरोबर या सिनेमात चीनी अभिनेत्री झू झूही काम करणार आहे. तर ‘ए दिल है मुश्किल’च्या टिझरआधी या सिनेमाचे पहिले पोस्टरही काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते. पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर काही क्षणांतच सोशल मीडियावर या सिनेमाबाबतची चर्चा सुरु झाली. नंतर या सिनेमाचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला. एकतर्फी प्रेम, घनिष्ठ मैत्री आणि त्यातून होणारा हिरमोड असे हटके कथानक हाताळत हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि अभिनेता फवाद खान अशी तगडी स्टारकास्ट ‘ए दिल है मुश्किल’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीची रंगत वाढवण्यात करणचा ‘ए दिल है मुश्किल’ किती यशस्वी ठरतो हे येणाऱ्या काळातच ठरेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2016 8:33 pm